वादळवारा, अवकाळी पावसामुळे ५१० एकरातील पिकांचे नुकसान!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 12:36 PM2023-03-08T12:36:46+5:302023-03-08T12:38:46+5:30
जिल्ह्याच्या बहुतांश तालुक्यांत सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपिटही झाली.
वाशिम : एकामागून एक कोसळणाऱ्या संकटापुढे शेतकरी पुरता गारद झाला असून, गत दोन दिवसांतील अवकाळी पाऊस, गारपिट व वादळवाऱ्यामुळे ५१० एकरातील ( २०४ हेक्टर) पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला. तातडीने पंचनामे करण्याचे निर्देशही जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणेला दिले.
जिल्ह्याच्या बहुतांश तालुक्यांत सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपिटही झाली. वादळवाऱ्याचा जोर प्रचंड असल्याने पपई, संत्रा यांसह अन्य फळबागेचे नुकसान झाले तसेच आंब्याचा मोहोरही गळून पडला. हवामान खात्याने ५ ते ७ मार्चदरम्यान जिल्ह्यात वादळवाऱ्यासह अवकाळी पावसाचे संकेत दिले होते. या संकेतानुसार सोमवारी सायंकाळी ग्रामीण भागात वादळवाऱ्यासह गारपिट, तुरळक पाऊस झाला. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण, वादळवारा आणि तुरळक पाऊस झाल्याने गारठा निर्माण झाला होता. अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा पिकाचे नुकसान झाले. वादळवाऱ्यामुळे संत्रा, पपई, लिंबू, आंब्याचेही प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर जणू आर्थिक संकटच कोसळले. हातातोंडाशी आलेला घास वादळवारा, गारपिट व अवकाळी पावसाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली.
वादळवारा, अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे जिल्ह्यातील २०४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वीज पडून एका गोऱ्हाचा मृत्यू झाला. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना संबंधितांना दिलेल्या आहेत.
- शैलेश हिंगे
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम