वाशिम जिल्ह्यात पीक नुकसानाचे पंचनामे अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 12:01 PM2021-03-31T12:01:14+5:302021-03-31T12:01:21+5:30
Crop damage panchnama in Washim district Incomplete : १० दिवस उलटून गेले तरी, या नुकसानीचे पंचनामेच अद्याप पूर्ण झाले नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात १९ ते २१ मार्च आणि २२ ते २३ मार्चदरम्यान वादळी वारा, अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीने रबी पिकांसह, भाजीपाला आणि फळपिकांचे अतोनात नुकसान झाले. प्रशासनाने ६८८० हेक्टर क्षेत्राला नैसर्गिक आपत्तीचा फटका बसल्याचा प्राथमिक अहवालही शासनाकडे पाठविला; परंतु १० दिवस उलटून गेले तरी, या नुकसानीचे पंचनामेच अद्याप पूर्ण झाले नाहीत. त्यामुळे पंचनामे पूर्ण होऊन शासनाकडे अंतिम अहवाल सादर होणार केव्हा आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्यातील बहुतांश भागांत १९ ते २१ मार्च आणि २२ ते २३ मार्चदरम्यानच्या कालावधीत वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पाऊस पडला. लाखो हेक्टर क्षेत्रातील रबी पिकांसह भाजीपाला आणि फळपिकांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला. त्यात वाशिम जिल्ह्यात २७ महसूल मंडळातील १६९ गावांतील गहू, हरभरा या रबी पिकांसह भाजीपाला पिके, तसेच टरबूज, खरबूज, पपई, संत्रा, लिंबू आदी फळपिकांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला असून, तसा प्राथमिक अहवालही शासनाकडे पाठविला आहे. तथापि, १० दिवस उलटले तरी तालुकास्तरावरून जिल्हास्तरावर अंतिम अहवालच सादर करण्यात आला नाही.
त्यामुळे प्रत्यक्ष पंचनामे पूर्ण होऊन शासनाकडे अंतिम अहवाल सादर होणार केव्हा आणि शेतकऱ्यांना मदत मिळणार केव्हा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
३० टक्के पंचनामे प्रलंबित
जिल्ह्यात ६८८० हेक्टर क्षेत्रातील रबी पिके, भाजीपाला पिके आणि फळपिकांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला आहे; परंतु ३० मार्चपर्यंतही यापैकी केवळ ७० टक्के क्षेत्रातील नुकसानीचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पूर्ण केले असून, उर्वरित ३० टक्के क्षेत्रातील पंचनामेच झाले नसल्याने तालुकास्तरावरून अंतिम अहवालच प्राप्त होऊ शकला नाही.