तणनाशक फवारल्याने पिकेच करपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 04:32 PM2019-07-14T16:32:46+5:302019-07-14T16:33:03+5:30
पिकांतील तणाचे नियंत्रण करण्यासाठी फवारण्यात आलेल्या तणनाशक औषधांमुळे सोयाबीनचे पिकच करपले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: पिकांतील तणावर नियंत्रण मिळविण्यासाठी फवारणी केलेल्या तणनाशक औषधांमुळे पिकेच करपल्याच्या घटना घडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. प्रामुख्याने सोयाबीन पिकाला तणनाशकाचा फटका बसला असून, कृषी विभागाने या नुकसानाची पाहणी करण्यासह संबंधित कंपनीवर कारवाई करावी आणि नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. मानोरा, मंगरुळपीर आणि वाशिम तालुक्यात ५० एकर क्षत्रातील पिके निकृष्ट तणनाशकामुळे करपली आहेत.
वाशिम जिल्ह्यात कृषी विभागाच्या ९ जुलै रोजीच्या अहवालानुसार ३ लाख ३१ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली आहे. त्यात सोयाबीनचे प्रमाण अधिक आहे. जल्ह्यात सद्यस्थितीत २ लाख ४४ हजार ६५७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, ५२ हजार १३८ हेक्टर क्षेत्रावर तूर, २० हजार २३२ हेक्टर क्षेत्रावर कपाशी, ७ हजार २४६ क्षेत्रावर उडिद, तर ५ हजार ४५५ हेक्टर क्षेत्रावर मुग या प्रमुख पिकांसह ज्वारी, मका, सुर्यफुल, ऊस आणि इतर पिकांचीही काही प्रमाणात पेरणी झाली आहे. आता पावसाने दडी मारल्यामुळे पिके करपत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. त्यातच पिकांतील तणाचे नियंत्रण करण्यासाठी फवारण्यात आलेल्या तणनाशक औषधांमुळे सोयाबीनचे पिकच करपले आहे. मानोरा तालुक्यातील खापरी, गिर्डा येथील १५, मंगरुळपीर तालुक्यातील जोगलदरी येथील दोन आणि वाशिम तालुक्यातील एक शेतकरी मिळून एकूण १८ शेतकºयांना निकृष्ट तणनाशक फवारणीचा फटका बसला असून, या सर्वांचे मिळून ५० पेक्षा अधिक एकर क्षेत्रातील पिक करपले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
तण नियंत्रणासाठी फवारणी केलेल्या औषधामुळे पिकेच करपल्याने आर्थिक नुकसान झालेल्या मंगरुळपीर आणि मानोरा तालुक्यातील १७ शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केली असून, या प्रकरणी संबंधित कृषीसेवा केंद्र आणि तणनाशक निर्मात्या कंपनीवर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.