जिल्ह्यातील पीक पाहणी खोळंबली!
By admin | Published: July 14, 2017 01:49 AM2017-07-14T01:49:56+5:302017-07-14T01:49:56+5:30
शेतकरी चिंताग्रस्त: कृषी सहायकांच्या आंदोलनामुळे अडचणी
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : यंदा पावसाने प्रदीर्घ दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील पिके संकटात असून, शेकडो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. जिल्हा स्तरावर कृषी विभागाने ही परिस्थिती जाणून घेण्यासाठी पीक पाहणी करण्याचेही ठरवले; परंतु शासनाच्या इतर योजनांची अंमलबजावणी सुरू असतानाच कृषी सहायकांच्या काम बंद आंदोलनामुळे पीक पाहणीच्या कामात खोळंबा निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात यंदा सुरुवातीला जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसाने प्रदीर्घ विश्रांती घेतल्यामुळे खरीप हंगामच संकटात सापडला आहे. सुरुवातीच्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यात जूनच्या पूर्वाधातच ५० टक्क्यांहून अधिक पेरणी आटोपली, तर सद्यस्थितीत एकूण प्रस्तावित असलेल्या ४ लाख १३ हजार हेक्टरपैकी ३ लाख ५० हजारांहून अधिक क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे.
तथापि, पावसाने दडी मारल्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकटही ओढवले आहे. प्रामुख्याने कारंजा, मानोरा आणि मंगरुळपीर तालुक्यातील पीकपरिस्थिती गंभीर असल्याचे दिसत आहे. जिल्हा कृषी विभागाच्यावतीने याबाबत आढावा घेण्यासाठी पीक पाहणी कार्यक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले. कोठे दुबार पेरणीचे संकट आहे, कोण्या भागात पिकाची परिस्थिती गंभीर आहे, याची माहिती घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे आणि नुकसान टाळणे हा कृषी विभागाचा उद्देश होता.
त्याबाबत तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांना सूचनाही देण्यात आल्या. तथापि, कृषी विभागाकडे मर्यादित मनुष्यबळ असल्याने आधीच अनेक अडचणी असताना आता त्यात कृषी विभागाच्या आंदोलनाचीही भर पडली आहे. राज्य शासनाने स्वतंत्र मृद व जलसंधारण विभाग स्थापन केला आहे. यामुळे कृषी सहायकांवर मोठा अन्याय होणार आहे. तो होऊ नये यासाठी जिल्ह्यातील कृषी सहायकांनी मागील दीड महिन्यांपासून विविध टप्प्यांत आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला; परंतु शासनाकडून त्याची दखल घेण्यात आली नाही.
त्यामुळे कृषी सहायकांना नाइलाजास्तव काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घ्यावा लागला. आता मागील तीन दिवसांपासून हे आंदोलन सुरू असल्याने कृषी विभागाच्या विविध कामांवर परिणाम होत आहे. जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण आणि पीक परिस्थितीची माहिती घेतली असता कारंजा, मंगरुळपीर आणि मानोरा तालुक्यात पावसाअभावी जवळपास ३० टक्के शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवल्याचे कळले. कृषी विभागाकडून याबाबत अधिक आणि अचूक माहिती घेण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत; परंतु आवश्यक मनुष्यबळाअभावी त्यांना निश्चित आकडेवारी मिळणे कठीण झाले आहे.
जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या माहितीनुसार आम्ही प्रत्यक्ष पाहणी करण्याचे ठरविले आहे; परंतु अपुऱ्या मनुष्यबळाअभावी पीक परिस्थितीचा अंदाज घेण्यासह इतर योजनांची अंमलबजावणी कठीण झाली आहे.
-दत्तात्रय गावसाने
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम.