९१ हजार शेतकऱ्यांना पीककर्ज; नवीन खातेदार केवळ ३७६५
By दिनेश पठाडे | Published: June 21, 2023 05:39 PM2023-06-21T17:39:25+5:302023-06-21T17:39:33+5:30
नुतनीकरण केल्यामुळेच वाढला पीककर्ज वाटपाचा टक्का
वाशिम : मागील चार वर्षांच्या तुलनेत यंदा सुरुवातीच्या काही दिवसांतच विक्रमी कर्जवाटप झाले आहे. यापूर्वी पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी कर्जाचे नुतनीकरण केल्यामुळेच कर्जाची टक्केवारी वाढली असल्याचे दिसून येते. २१ जूनपर्यंत ९१ हजार २५९ हजार शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप झाले असून त्यापैकी ८७ हजार ४९४ शेतकऱ्यांनी कर्जाचे नुतनीकरण केले आहे. तर केवळ ३ हजार ७६५ नवीन खातेदार शेतकऱ्यांना खरीप हंगामात पीककर्ज मिळाले आहे.
खरीप हंगाम २०२३-२४ साठी जिल्ह्याला १ हजार ४०४ कोटी ८४ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. ज्याचा लाभ १ लाख २१ हजार ९८८ शेतकऱ्यांना होणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात १ एप्रिलपासून कर्जवाटपास सुरुवात झाली असून २१ जूनपर्यंत ७४.८१ टक्के शेतकऱ्यांना कर्जवाटप केले. रकमेनुसार ६३.६३ टक्के कर्जवाटप झाले आहे. यंदा सार्वजनिक, खासगी क्षेत्रासह मध्यवर्ती आणि विदर्भ बँकेने कर्जवाटपात सातत्य राखल्याने टक्केवारी वाढली आहे. शिवाय अधिकाधिक शेतकऱ्यांना पेरणीपूर्वीच कर्ज मिळत असल्याने पेरणीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना तयारी करणे शक्य होत आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करण्यास प्राधान्य दिले. कर्जाची रक्कम भरल्यानंतर बँकांनी काही प्रमाणात वाढीव कर्ज देऊन पीककर्जाचे नुतनीकरण केले. त्यामुळे कर्जवाटपाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नवीन खातेदार शेतकऱ्यांची संख्या अपेक्षित नसल्याची स्थिती आहे.
नवीन खातेदारांना ४५.६९ कोटी वाटप
जिल्ह्यात आतापर्यंत ३७६५ नवीन खातेदार शेतकऱ्यांना ४५ कोटी ६९ लाख ४६ हजार रुपयांचे कर्जवाटप केले आहे. नवीन खातेदारांना कर्जवाटप करण्यात खासगी क्षेत्रातील बँका आघाडीवर आहेत. दरम्यान, नुतनीकरण केलेल्या ८७ हजार ४९४ शेतकऱ्यांना ८४८ कोटी २४ लाख ३३ हजार रुपयांचे कर्जवाटप केले आहे.