८४ हजार शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 12:19 PM2021-07-26T12:19:47+5:302021-07-26T12:19:53+5:30
Crop loans distributed to 84,000 farmers : जिल्ह्यातील ८४ हजार शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत जिल्ह्यातील ८४ हजार शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.
गतवर्षातील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानातून स्वत:ला सावरत यंदा शेतकऱ्यांनी नव्या जोमाने खरीप हंगामाची तयारी केली. शेती मशागत, बियाणे, खते खरेदीसाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाची आवश्यकता असते. यंदा चार लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झालेली असून, सर्वाधिक पेरा सोयाबीनचा आहे. दरम्यान, शेती मशागतीसाठी पीक कर्ज काढताना शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून यंदा कोरोनाकाळातही बँक सुरू ठेवण्यास मुभा होती. पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना बँकेसमोर रांगेत उभे राहावे लागले.
यंदाही राष्ट्रीयीकृत बँकांपेक्षा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पीक कर्ज वितरणात आघाडी घेतली आहे. ३५ टक्के राष्ट्रीयीकृत बँकांचा अपवाद वगळता उर्वरित बँकांनी मात्र पीककर्ज वितरणात हात आखडता घेतल्याचे दिसून येते. गतवर्षी १५ जुलैपर्यंत ७२ हजार २० शेतकऱ्यांना सुमारे ५१६ कोटी ७७ लाख रुपये पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. यंदा आतापर्यंत ८४ हजार शेतकऱ्यांना ६८७ कोटी रुपयांचे पीक कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पीक कर्ज वितरणाच्या टक्केवारीत वाढ असल्याचे दिसून येते.