तुरीच्या पिकावर रानडुकरांचा डल्ला!
By admin | Published: November 28, 2015 02:48 AM2015-11-28T02:48:44+5:302015-11-28T02:48:44+5:30
वनविभागाने लक्ष देणे गरजेचे; वाशिम जिल्ह्यात ५३९२७ हेक्टरवर तुरीचा पेरा.
नंदकिशोर नारे /वाशिम सद्यस्थितीत तूर पीक फुलावर तर काही ठिकाणी शेंगा धरल्या आहेत. या पिकांवर रानडुकरांनी हल्ला चढविला असून, पिकाचे नुकसान करीत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. रात्री जागल करुन शेतकरी पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. वनविभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत. जिल्हय़ात यावर्षी ५३९२७ हेक्टर क्षेत्रावर तुरीच्या पिकांचे क्षेत्र आहे. या पिकांच्या संरक्षणासाठी शेतकरी रात्रंदिवस जागरण करुन वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना आता रानडुकरांमुळे शेतकर्यांच्या पिकांचे फार मोठे नुकसान होत आहे. रानडुकरांनी केलेल्या नुकसानाचे कोणत्याच प्रकारची मदत कृषी विभागाकडून केल्या जात नाही. वनविभागाकडून मदत केल्या जात असली तरी अतिशय किचकट पद्धत असल्याने शेतकरी त्या झंझटीत पडताना दिसून येत नाही. मानोरा व कारंजा तालुका वगळता जिल्हय़ातील उर्वरित चार तालुक्यांमध्ये तुरीचे पीक मोठय़ा प्रमाणात घेण्यात येत आहे. यामध्ये सर्वाधिक तुरीचा पेरा मंगरुळपीर तालुक्यात असून, या भागात रानडुकरांचा हैदोस वाढला आहे. जिल्हय़ात आधिच ढगाळ वातावरणामुळे खरीप तसेच रब्बी हंगामातील लाखो हेक्टवरील पिके धोक्यात आली असताना शेतकर्यांच्या तुरीला फुले आले तर काही ठिकाणी शेंगा पकडल्यात. या परिस्थितीत वन्यप्राण्यांनी हैदोस घातल्याने शेतकर्यांच्या पिकातील ओळय़ाच्या ओळय़ा रानडुकरं संपवत आहे. वनविभागाने याकडे लक्ष देऊन शेतकर्यांचे नुकसान होणार नाही, याबाबत उपाययोजना करणे गरजेचे आहे.