शिरपुरात बँकेसमोर नागरिकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 05:22 PM2020-04-29T17:22:44+5:302020-04-29T17:23:06+5:30
फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम पायदळी तुडवून नागरीक गर्दी करीत असल्याचे २९ एप्रिल रोजी बँक परिसर व गावातील बाजारपेठेत दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन : जिल्हा कोरोनामुक्त झाला असला; तरी संभाव्य कोणताही धोका नको म्हणून लॉकडाउन व संचारबंदीची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र, शिरपूर येथे फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम पायदळी तुडवून नागरीक गर्दी करीत असल्याचे २९ एप्रिल रोजी बँक परिसर व गावातील बाजारपेठेत दिसून आले.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. शिरपूर येथील आठवडी बाजारात नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून भाजीपाला बाजाराची विभागणी करण्यात आली आहे. तीन, चार ठिकाणी भाजीबाजार भरत असल्याने पूर्वीच्या तुलनेत आता गर्दी कमी झाली आहे. दुसरीकडे विविध योजनेंतर्गतचे अनुदान काढण्यासाठी लाभार्थींची राष्ट्रीयकृत बँकेत गर्दी होत आहे. २० एप्रिलनंतर संचारबंदीतून अत्यावश्यक सेवा, कृषीशी निगडीत सेवांना शिथीलता मिळाल्याने शिरपूर येथे जणू काही संचारबंदी हटली, या अविर्भावात काही नागरिक वावरत असल्याचे २९ एप्रिल रोजी दिसून आले. सार्वजनिक ठिकाणी, बँकेसमोर तसेच बाजारपेठेत गर्दी होऊ नये याची दक्षता घेण्याच्या सूचना तालुका प्रशासनाने स्थानिक प्रशासन, बँक प्रशासनाला दिलेल्या आहेत. मात्र, तरीही गर्दी होत असल्याने कोरोना विषाणू संसर्गाची साखळी कशी तुटणार, असा सवाल उपस्थित होत आहे. शिरपूर येथील राष्ट्रीयकृत बँकांसमोरील गर्दी हटता हटेना, अशी परिस्थिती आहे. फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालनही होत नसल्याने कोरोना विषाणू संसर्गाबाबत नागरीक फारसे गंभीर नसल्याचे दिसून येते. शिरपूर येथील बाजारपेठ व बँक परिसरात गर्दी होणार नाही यासाठी पोलीस कर्मचारी किंवा होमगार्ड तैनात करणे आवश्यक ठरत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे अपेक्षीत आहे.
आमची बँक राष्ट्रीयकृत असल्याने शासनाच्या विविध योजनांचे लाभार्थींचे अनुदान बँंक आॅफ महाराष्ट्र शाखा शिरपूरमार्फत वाटप होते. अनुदान घेण्यासाठी गर्दी होत आहे. आम्ही फिजिकल डिस्टन्सिंगबाबत स्वत: पुढाकार घेऊन ग्राहकांना आवाहनही करीत आहोत. गर्दी होऊ नये म्हणून एका व्यक्तीकडे जबाबदारीही सोपविली आहे. मात्र तरीदेखील कधी-कधी लाभार्थी गर्दी करतातच. कार्यालयीन वेळेत बँकेसमोर एखादा पोलीस कर्मचारी किंवा होमगार्ड तैनात केला तर गर्दी आटोक्यात येऊ शकेल.
- शशी कुमार, व्यवस्थापक
बँक आॅफ महाराष्ट्र, शिरपूर शाखा
कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, गावात गर्दी करू नये.
- बी.पी. भुरकाडे, ग्रामसचिव
ग्रामपंचायत, शिरपूर ता.मालेगाव