आधार नोंदणीसाठी रिसोड तहसिलमध्ये नागरिकांची गर्दी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 12:55 PM2020-09-08T12:55:08+5:302020-09-08T12:55:19+5:30
रिसोड शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाही अनेक नागरिक बिनधास्त असल्याचे दिसून येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रिसोड शहरात एकिकडे जनता कर्फ्यूची हाक दिली जात आहे तर दुसरीकडे आधार नोंदणीसाठी तहसिल कार्यालयात नागरिकांची गर्दी होत आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकही आधार कार्ड काढण्यासाठी तहसिल कार्यालयात येत असल्याने कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. रिसोड शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाही अनेक नागरिक बिनधास्त असल्याचे दिसून येते. दुसरीकडे प्रशासनही हतबल होत आहे.
विविध योजना, उपक्रम व अन्य शासकीय कामासाठी आधार कार्डची सक्ती केली जात आहे. शहर व ग्रामीण भागातील अनेकांकडे आधार कार्ड नाहीत. आधार नोंदणीसाठी तहसिल कार्यालय परिसरात सकाळपासूनच नागरिकांची गर्दी होत आहे. ग्रामीण भागात आधार नोंदणी केंद्र नाही. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिक दररोज मोठ्या संख्येने तहसिल कार्यालय येथे येत आहेत. काही नागरिक तर सकाळपासूनच आधार केंद्रासमोर नोंदणीसाठी रांग लावतात. येथे फिजिकल डिस्टन्सिंगचे कोणतेही पालन होत नसल्याचे गर्दीवरून दिसून येते. रिसोड शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाही, दुसरीकडे नागरिक बिनधास्त असल्याचे दिसून येते.
आधार केंद्राची संपूर्ण प्रक्रिया ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आली आहे. असा काही प्रकार घडत असेल तर याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार करून यासाठी काय करता येईल, याचे मार्गदर्शन मागविले जाईल.
- अजित शेलार,
तहसिलदार रिसोड