अधिक मासातील चतुर्थीनिमित्त गणपती मंदिरात भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 04:25 PM2018-06-02T16:25:06+5:302018-06-02T16:25:06+5:30
मालेगाव: गेल्या १६ दिवसांपासून सुरू झालेल्या अधिक मासात शनिवार २ जून रोजी आलेल्या चतुर्थीनिमित्त हिवरा येथील गणपती मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती.
मालेगाव: गेल्या १६ दिवसांपासून सुरू झालेल्या अधिक मासात शनिवार २ जून रोजी आलेल्या चतुर्थीनिमित्त हिवरा येथील गणपती मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. यामुळे प्रत्येक भाविकाला दर्शनासाठी ३ तास ताटकळत उभे राहावे लागल्याचे चित्र मालेगाव तालुक्यातील हिवरा येथे शनिवारी पाहायला मिळाले.
हिंदू पंचांगानुसार यंदाच्या वर्षी दोन ज्येष्ठ मास आहेत. प्रत्येक तिसºया वर्षी अधिक मास येतो. यंदाच्या अधिक मासाला १६ मे पासून प्रारंभ झाला असून, हा मास १२ जूनपर्यंत चालणार आहे. अधिक मासाला पुरूषोत्तम मास म्हणूनही संबोधले जाते. ज्या मासात सूर्य संक्राती होत नाही. तो अधिक मास मानला जातो. अधिक मासाच्या कृष्ण पक्षात आलेल्या चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाच्या पुजेला महत्त्व असते. त्यामुळे मालेगाव तालुक्यातील हिवरा येथील गणपती मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली होती. असंख्य महिला भाविकांनी भगवान श्रीगणेशाची पुजा करून मनोभावे दर्शन घेतले. यानिमित्त गणेशाला दुर्वा, मोदक चढवून प्रसादाचे वितरणही करण्यात आले.