बाजारपेठेत उसळली गर्दी; वाहतुकीची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:36 AM2021-05-22T04:36:46+5:302021-05-22T04:36:46+5:30
जिल्ह्यात इतर ठिकाणांप्रमाणेच मंगरूळपीर शहरासह तालुक्यातील सर्वच गावांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक ...
जिल्ह्यात इतर ठिकाणांप्रमाणेच मंगरूळपीर शहरासह तालुक्यातील सर्वच गावांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक निर्बंध लागू करून केवळ दवाखाने व मेडिकल्स सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती. त्यात २० मेपासून काहीअंशी शिथिलता देत सकाळच्या सुमारास चार तासांच्या कालावधीत किराणा दुकाने, डेअरी, भाजीपाला विक्री यासह इतर अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे; मात्र नागरिकांनी एकाचवेळी बाजारपेठेत गर्दी करू नये, तोंडाला सदोदित मास्कचा वापर करावा, दोन व्यक्तींमध्ये ठराविक अंतर ठेवावे, आदी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. असे असताना खरेदीसाठी उसळत असलेल्या गर्दीतील प्रत्येकजण नियमांचे उल्लंघन करीत आहे. फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाला जणू वाकुल्या दाखविण्यात येत आहेत. मास्कचा वापर बहुतांशजण करित आहेत; परंतु सॅनिटायझरच्या वापराकडे दुर्लक्ष केले आहे.
तथापि, कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता केवळ प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष केंद्रित न करता नागरिकांनीही स्वत:ची नैतिक जबाबदारी ओळखून नियमांचे पालन करावे. कोरोनाची लक्षणे दिसून आल्यास स्वत:हूनच ॲंटिजन किंवा आरटीपीसीआर चाचणी करून उपचार घ्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. (फोटो १)
.................
बाॅक्स :
पोलीस पथक आल्याशिवाय दुकाने होत नाहीत बंद
जिल्ह्यातील व्यापार हळूहळू पूर्वपदावर यावा, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंधातून शिथिलता प्रदान करत २० मेपासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने, व्यापार सकाळी ७ ते सकाळी ११ या वेळेत सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानंतर दुकानदारांनी स्वत:हूनच साहित्य विक्री बंद करायला हवी; मात्र तसे होत नाही. पोलीस किंवा नगर परिषदेच्या पथकास बाजारपेठेत येऊन दुकाने बंद करण्याचे आवाहन करावे लागत असल्याचे दिसून येत आहे.
..............
बाॅक्स :
विनाकारण फिरणाऱ्यांची कसून चाैकशी
साधारणत: दुपारी १२ वाजतानंतर मंगरूळपीर शहरातील सर्व दुकाने बंद होत असल्याने रस्त्यावर शुकशुकाट पसरत आहे. त्यानंतर विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची पोलिसांकडून कसून चाैकशी केली जात आहे. ज्या व्यक्ती योग्य कारण सांगू शकत नाही, अशांवर दंडात्मक स्वरूपातील कारवाई केली जात असल्याचे पाहावयास मिळत आहे.