शिथिलता मिळताच पहिल्याच दिवशी बाजारपेठेत गर्दी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 05:49 PM2020-08-01T17:49:12+5:302020-08-01T17:49:24+5:30
पहिल्याच दिवशी वाशिमसह जिल्ह्यातील बाजारपेठेत नागरिकांची गर्दी उसळली असून, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालनही झाले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या १७ दिवसांपासून दुपारी २ वाजेपर्यंतच दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी होती. १ आॅगस्टपासून लॉकडाऊन शिथिल केले असून, आता सायंकाळी ५ वाजेपर्यंत बाजारपेठ खुली राहणार आहे. पहिल्याच दिवशी वाशिमसह जिल्ह्यातील बाजारपेठेत नागरिकांची गर्दी उसळली असून, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालनही झाले नाही.
बाहेरगावावरून परतणाऱ्या नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. जुलै महिन्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रिसोड व मंगरूळपीर शहरात १५ ते २१ जुलैदरम्यान संपूर्ण लॉकडाऊन तर उर्वरीत शहरात १५ ते ३१ जुलैदरम्यान सकाळी १० ते दुपारी २ या दरम्यान बाजारपेठ खुली होती. लॉकडाऊनसंदर्भात १ आॅगस्टपासून सुधारीत नियमावली लागू झाली. जिल्ह्यात ३१ आॅगस्ट २०२० पर्यंत लॉकडाऊन लागू राहणार आहे. जिल्ह्यात यापूर्वी परवानगी दिलेली सर्व दुकाने, आस्थापना, सेवा सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच दवाखाने (पशुवैद्यकीय दवाखान्यांसह), मेडिकल स्टोअर्स २४ तास सुरु राहणार आहेत. नवीन नियमावलीनुसार दुध संकलन व विक्री, भाजीपाला बाजार सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. सर्व बँका सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहतील. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पहिल्याच दिवशी वाशिमसह रिसोड, मालेगाव, कारंजा, मानोरा, मंगरूळपीर येथील बाजारपेठेत नागरिकांची गर्दी झाल्याचे दिसून आले. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालनही झाले नाही. वाशिम येथील पाटणी चौकातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेची चांगलीच दमछाक झाली. बँका सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार असतानाही, दुपारच्या सुमारास बँकेत ग्राहकांची एकच गर्दी झाल्याचे दिसून आले. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले.