व्यावसायिकांची कोरोना चाचणीसाठी गर्दी; फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:49 AM2021-03-01T04:49:13+5:302021-03-01T04:49:13+5:30
व्यवस्थेचा अभाव : धनज बु. येथील प्रकार धनज बु. : परिसरात वाढत असलेला कोरोना संसर्ग लक्षात घेत प्रशासन आणि ...
व्यवस्थेचा अभाव : धनज बु. येथील प्रकार
धनज बु. : परिसरात वाढत असलेला कोरोना संसर्ग लक्षात घेत प्रशासन आणि आरोग्य विभागाने धनज बु. येथील व्यावसायिकाना कोरोना चाचणी करणे बंधनकारक केले असून, रविवारी व्यावसायिकांनी धनज बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये चाचणी करण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. धनज बु.सह परिसरात गेल्या दहा दिवसांपासून दरदिवशी कोरोना संसर्गाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. आजवर एकट्या धनज बु. येथेच ५०पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले असून, परिसरातील मेहा, भिवरी, अंबोडा, नांगरवाडी, भामदेवी, पिंपळगाव आदी गावांतही गेल्या काही दिवसांत कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग खडबडून जागा झाला असून, गावागावांत ग्रामस्थांची कोरोना चाचणी करतानाच व्यावसायिकांनाही कोरोना चाचणी करणे प्रशासन आणि आरोग्य विभागाने बंधनकारक केले आहे. धनज बु. येथील व्यावसायिकांना त्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. धनज बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य विभागाकडून व्यावसायिकांची कोरोना चाचणी केली जात आहे. त्यात रविवारी कोरोना चाचणीसाठी व्यावसायिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा पार बोजवारा उडाला. परिसरात कोरोना संसर्ग उफाळला असतानाही आरोग्य विभागाने दक्षता म्हणून या ठिकाणी व्यावसायिकांत फिजिकल डिस्टन्सिंग राखण्यासाठी व्यवस्था केली नसल्याने हा प्रकार घडला.
-------------
९८ आरटीपीसीआर, ११ ॲन्टिजेन टेस्ट
धनज बु. येथे वाढत असलेल्या काेरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून व्यावसायिकांची कोरोना चाचणी करण्यात येत असून, रविवारी प्राथमिक आरोग्य केंद्रात ९८ जणांची आरटीपीसीआर, तर ११ जणांची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट मिळून एकूण १०९ व्यावसायिकांची कोरोना चाचणी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली.
----------
संपर्कातील व्यक्तींच्या माहितीसाठी आवाहन
धनज बु. परिसरात कोरोना विषाणू संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने नियंत्रणासाठी बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची तातडीने कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करून स्वत:च बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती मिळण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
------------
मेहा येथे कोरोना चाचणी
धनज बु.: परिसरातील मेहा येथे दरदिवशी कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती संकलित करून त्यांची कोरोना चाचणी रविवारी करण्यात आली.
-------------
कामरगाव ग्रामपंचायतची सभा
कामरगाव : गावात वाढत असलेला कोरोना संसर्ग लक्षात घेत आवश्यक उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांची शनिवारी साधारण सभा घेण्यात आली.