सार्वजनिक ठिकाणी गर्दी, ‘मास्क’चा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:42 AM2021-04-04T04:42:44+5:302021-04-04T04:42:44+5:30
जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग १५ फेब्रुवारीपर्यंत आटोक्यात होता; मात्र त्यानंतर रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून ३ एप्रिलअखेर एकूण बाधितांचा ...
जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग १५ फेब्रुवारीपर्यंत आटोक्यात होता; मात्र त्यानंतर रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून ३ एप्रिलअखेर एकूण बाधितांचा आकडा १६ हजार ९६१ वर पोहोचला आहे. कोरोनाने आतापर्यंत जिल्ह्यात १८९ व्यक्तींना जीव गमवावा लागला. दरम्यान, दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चाललेल्या कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध स्वरूपातील नियम लागू केले. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी वावरताना फिजिकल डिस्टन्सिंग, तोंडाला मास्क न लावणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर सातत्याने कारवाई करण्याचे सत्र अवलंबिण्यात आले आहे. याउपरही बहुतांश नागरिक ना कोरोनाला जुमानत आहेत, ना प्रशासनाच्या कारवाईला.
वाशिम येथील बसस्थानक, रेल्वेस्थानक आणि पहाटेच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरविल्या जाणाऱ्या भाजीपाला हर्रासीच्या ठिकाणी शनिवारी भेट देऊन पाहणी केली असता अनेकजण विनामास्क दिसून आले. याशिवाय फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर कोणीच करताना आढळले नाही. एखाद्या कोपऱ्यात आडोसा घेऊन काहीजण धूम्रपान करताना, तर काहीजण गुटखापुडी खाऊन थुंकताना आढळून आले. यावरून प्रशासन जरी कोरोनाला हरविण्याच्या मोहिमेसाठी दिवसरात्र युद्धपातळीवर प्रयत्न करीत असले, तरी नागरिक मात्र आजही कोरोनाबाबत गंभीर नसल्याचे सिद्ध होत आहे.
..........................
भाजीपाला हर्रासी
वाशिम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दररोज सकाळच्या सुमारास भाजीपाल्याची हर्रासी केली जाते. त्याठिकाणी भेट दिली असता, मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले. अनेकजण विनामास्क होते, तर फिजिकल डिस्टन्सिंगचा पूर्णत: फज्जा उडाला होता.
...................
वाशिम रेल्वेस्थानक
वाशिम रेल्वेस्थानकावर दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास इंटरसिटी एक्स्प्रेस रेल्वेचे आगमन होते. त्याठिकाणी भेट दिली असता काही ऑटोचालक, रेल्वेतून उतरणाऱ्या व चढणाऱ्या प्रवाशांच्या तोंडाला मास्क दिसले नाहीत.
.............
वाशिम बसस्थानक
बसस्थानकावरही तशीच परिस्थती कायम होती. विनामास्क एकमेकांशी अगदी खेटून गप्पागोष्टींमध्ये काहीजण रमले होते. एस.टी. आल्यानंतर पूर्वीप्रमाणेच गर्दी करून चढउतार करणाऱ्या प्रवाशांना कोरोनाचे कुठलेच गांभीर्य असल्याचे आढळले नाही.