वाशिमच्या बाजारपेठेत उसळली गर्दी; वाहतूक प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:46 AM2021-05-25T04:46:38+5:302021-05-25T04:46:38+5:30
जिल्ह्यात इतर ठिकाणांप्रमाणेच वाशिम शहरातही कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक निर्बंध लागू ...
जिल्ह्यात इतर ठिकाणांप्रमाणेच वाशिम शहरातही कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक निर्बंध लागू करून केवळ दवाखाने व मेडिकल्स सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती. त्यात २० मेपासून काहीअंशी शिथिलता देत सकाळच्या सुमारास चार तासांच्या कालावधीत किराणा दुकाने, डेअरी, भाजीपाला विक्री यांसह इतर अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे; मात्र नागरिकांनी एकाचवेळी बाजारपेठेत गर्दी करू नये, तोंडाला मास्कचा वापर करावा, दोन व्यक्तींमध्ये ठरावीक अंतर ठेवा, आदी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे; मात्र सकाळच्या सुमारास नागरिक खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असून, नियमांचे उल्लंघन होत आहे.
.................
बाॅक्स :
दुकाने बंद करण्यासाठी पोलिसांचे आवाहन
वाशिम शहरात सकाळी ७ ते ११ या वेळेत अत्यावश्यक सेवेची दुकाने उघडली जात आहेत. नियमानुसार सदर दुकाने व्यापाऱ्यांनी ठीक ११ वाजता स्वत:हूनच बंद करायला हवीत; मात्र तसे होत नसून पोलिसांना बाजारपेठेत फिरून दुकाने बंद करण्याचे आवाहन करावे लागत असल्याचे दिसून येत आहे.
..............
बाॅक्स :
फळविक्रेत्यांची धावाधाव
वाशिम शहरातील पाटणी चौक ते शिवाजी चौक या रस्त्यावर सर्व प्रकारच्या साहित्य विक्रीची दुकाने वसलेली आहेत. त्यामुळे त्याचठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. फळविक्रेत्यांच्या हातगाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या राहतात. दुचाकी वाहनचालक गाडीजवळ उभे राहून फळे खरेदी करतात. यामुळे वाहतूक प्रभावित होते. यादरम्यान पोलीस कारवाई केली जात आहे. पोलीस येताच फळविक्रेत्यांची चांगलीच धावाधाव होत असल्याचे दिसून येत आहे.