गोवंशाची निर्दयतेने वाहतूक करणारे कारवाईच्या ‘रडार’वर
By सुनील काकडे | Published: May 20, 2023 06:46 PM2023-05-20T18:46:19+5:302023-05-20T18:48:01+5:30
वाशिम जिल्ह्यात पाच दिवसांत २६ जनावरांची मुक्तता
सुनील काकडे, वाशिम: महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ अन्वये जनावरांना वाहनांमध्ये निर्दयतेने कोंबून वाहतूक करणे, त्यांची कत्तल करणे किंवा गोवंश मांस बाळगण्यास बंदी आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिस प्रशासनाकडून धडक कारवाई केली जात आहे. याअंतर्गत १५ आणि १९ मे रोजी दोन मोठ्या कारवाया करत पोलिसांनी एकूण २४.५० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. २६ जनावरांची मुक्तता करण्यासह तीन आरोपींवर याप्रकरणी कारवाई करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, १५ मे रोजी कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीत सहायक फौजदार धनराज पवार हे त्यांच्या चमुसह समृद्धी महामार्गावर गस्त घालत असताना आखातवाडा गावानजिक नागपूरवरून भरधाव वेगात येणाऱ्या बोलेरो पिकअप गाडीला (क्रमांक एम.एच. ४० सी.एम. २६६४) अडवून तपासणी करण्यात आली. या वाहनात निर्दयतेने कोंबून भरलेल्या अवस्थेत १० बैल, गाय व गोरे आढळून आले. वाहनचालक सुकेष्णू मनोहर सावसाकडे यास ११.५० लाखांच्या मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतले.
हे प्रकरण ताजे असतानाच १९ मे रोजी कारंजा ग्रामीण पो.स्टे.च्या हद्दीतच नागपूरवरून येणाऱ्या आयशर गाडीतही (क्रमांक एम.एच. ४० बी.जी. ९७४१) निर्दयतेने कोंबून भरलेल्या अवस्थेत १६ जनावरे आढळून आली. याप्रकरणी वाहनचालक शेख मुजाहिद शेख तालिब आणि शेख रियाज शेख अल्ताफ यांना १३ लाखांच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. नमूद तिन्ही आरोपींवर कलम ११ (१)(ड) प्राण्यांना क्रुरपणे वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम १९६०, सहकलम ५ (ब) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सहकलम १३०/१७७, ८३/१७७, १५८/१७७ तसेच मोटार वाहन कायद्यातील तरतुदीप्रमाणे कारवाई करण्यात आली.
महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमातील तरतुदींनुसार जनावरांना निर्दयतेने तथा वाहनात कोंबून वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. नागरिकांनाही सभोवताल असा प्रकार कुठे आढळून आल्यास त्यांनी वाशिम नियंत्रण कक्ष, डायल ११२ वर माहिती द्यावी. संबंधित पो.स्टे.च्या प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांनाही याबाबत अवगत करावे. - बच्चन सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम