आपले सरकार केंद्राकडून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 11:29 AM2020-07-19T11:29:43+5:302020-07-19T11:30:29+5:30
सरसकट सहा हजार रुपये वसूल करून ग्रामपंचायतींची सर्रास आर्थिक लूट केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ‘आपले सरकार सेवा’तर्फे ग्रामपंचायतींकडून संगणक परिचालकांचे मानधन हे उपस्थितीनुसार न घेता, सरसकट सहा हजार रुपये वसूल करून ग्रामपंचायतींची सर्रास आर्थिक लूट केली जात आहे. परंतू, ‘आपले सरकार सेवा’ मात्र संगणक परिचालकांना हजेरीनुसार मानधन देत आहे. दुसरीकडे १० ते १५ ग्राम पंचायतींमधील संगणक आॅपरेटर सोडून गेलेले असताना तसेच १५ ते २० ग्रामपंचायतींमध्ये वीजपुरवठा खंडीत असतानाही, ग्रामपंचायतींकडून दरमहा सहा हजार रुपये घेत लूट करीत आहेत.
ग्रामपंचायतींमधून मिळणारे विविध प्रकारचे दाखले आॅनलाईन पद्धतीने मिळावे, कामात सुसूत्रता यावी, प्रशासकीय दिरंगाई होऊ नये म्हणून ग्रामपंचायतींच्या कारभाराला आॅनलाईनची जोड देण्यात आली. जिल्ह्यात ४९१ ग्रामपंचायती असून, येथे आपले सरकार सेवा सुरू करण्यात आली. नियमित मानधन मिळत नसल्याने १० ते १५ ग्रामपंचायतींमधील संगणक आॅपरेटर तीन, चार महिन्यात सोडून गेले तर १५ ते २० ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा खंडीत असल्याने तेथे आपले सरकार सेवा प्रभावित आहे. दुसरीकडे संगणक परिचालकाचे मानधन, चालकाचा प्रशिक्षण खर्च, कंपनी व्यवस्थापन आदींसाठी प्रत्येक ग्राम पंचायतीला दरमहा १०४५० व जीएसटी १८ टक्के असे एकूण १२३३१ रुपयाचे धनादेश जिल्हा परिषदच्या नावाने जमा करावे लागतात. संगणक परिचालकासाठी दरमहा सहा हजार रुपये ग्रामपंचायतींकडून वसूल केले जातात. परंतू, आपले सरकार सेवाद्वारे संगणक चालकांना उपस्थितीनुसारच पैसे देत आहेत. परंतु ग्रामपंचायतीकडून पूर्ण महिन्याचे पैसे घेतले जात असल्याने ही एकप्रकारे ग्रामपंचायतींची लूट असल्याच्या प्रतिक्रिया सरपंच संघटनेमधून उमटत आहेत.
ग्रामपंचायतींना आॅनलाईनची जोड मिळाली ही बाब स्तुत्य आहे. परंतू, बहुतेक ग्रामपंचायतीचे उत्पन्न खूप कमी आहे. उत्पन्न कमी असतानाही आपले सरकार सेवा यासाठी दरमहा १२ हजार रुपये द्यावे लागतात. संगणक आॅपरेटरच्या मानधनासाठी ग्रामपंचायतीकडून दरमहा सहा हजार रुपये घेतले जातात. दुसरीकडे व्यवस्थापनाकडून आॅपरेटरला उपस्थितीनुसार मानधन दिले जाते.
- विनोद पट्टेबहादूर
सरपंच, सुपखेला ता.वाशिम
शासनाने अनेक दाखले बंद केले. संगणक चालकाना वेळेवर वेतन मिळत नसल्याने काहींनी काम सोडले. त्यामुळे त्या ग्रामपंचायतींकडून संगणक आॅपरेटरच्या नावाखाली पैसे आकारू नये. दरमहा संगणक चालकाचा प्रशिक्षण खर्च १३०० रुपये घेतले जातात. दुसरीकडे प्रशिक्षण कार्यक्रमही नाही. या प्रकरणात सरपंचांना विश्वासातही घेतले जात नाही. - दीपक खडसे
सरपंच, खरोळा ता.वाशिम