घन ओथंबून येती अन् हुरहूर लावून जाती!
By admin | Published: July 6, 2014 10:45 PM2014-07-06T22:45:28+5:302014-07-06T23:28:19+5:30
आता अपेक्षा पुनर्वसूकडून : सर्वांच्या नजरा आकाशाकडे
मेहकर : पावसाळ्यातील दुसरा महिना उजाडुनही पावसाने हजेरी लावली नाही. आजपासून पुनर्वसू नक्षत्र लागले असून, सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. गत दोन दिवसांपासून तर घन ओथंबून येताहेत आणि सर्वांना पावसाची हुरहूर लावून जात आहेत. पावसाच्या दडीमुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचे संतुलण बिघडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
पावसाळ्यातील जून महिन्यात मृग व आद्रा ही दोन्ही नक्षत्रे पुर्णत: कोरडी गेली. तर जुलै महिन्यात ६ जुलै पासून पुनर्वसू नक्षत्र सुरू झाले असून, या नक्षत्राच्या मुहूर्तावर आकाशात फक्त ढग दाटुन येत आहेत. मात्र, पावसाची सरही कोसळली नाही. यंदा पुनर्वसू नक्षत्राचे गर्दभ हे वाहन असून, गर्दभ जिकडे चालले तिकडे चालले म्हणजे कुठे पाऊस पडेल व कुठे ढग कोरडेच फिरतील. अशीच काही स्थिती दिसत आहे. पावसाच्या हुलकावणीमुळे जलस्त्रोताची पातळीही खालावत आहे. त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थितीचे सावट निर्माण होऊन भविष्यात भिषण पाणी टंचाई उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मेहकर, सिंदखेडराजा व लोणार तालुक्यातील काही शेतकर्यांनी धुळ पेरणी केलेली असून त्यावर निसर्गाच्या अवकृपेमुळे बहुतांश धुळ पेरणी वाया गेली आहे. त्यामुळे अनेक शेतकर्यांचे माघामोलाचे बियाणे मातीत गेले आहेत. अनेक शेतकर्यांना आता दुबार पेरणी करावी लागणार आहे. या दिवसांत पूरजन्य परिस्थितीमुळे नदीनाले साफ स्वच्छ होऊन दुथडी भरुन वाहत असतात. परंतू, निसर्गाच्या विचित्र बदलामुळे नदीनाले व इतर जलस्त्रोत कोरडी ठण्ण पडली आहेत. तर काही नदी नाल्यांमध्ये थोड्या बहुत प्रमाणात जलसाठा असून, त्यातही शेवाळजन्य व कचरा घाण निर्माण झाल्यामुळे नदीच्या पाण्याला दुर्गंधी येऊ लागली आहे. प्रदुषण मोठय़ा प्रमाणावर निर्माण झाले आहे. पाऊस पडत नसल्याने नदीनाले व इतर जलस्त्रोतांमध्येही अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
पावसाच्या हुलकावणीमूळे सर्वांचीच चिंता वाढत असून, गावागावांमध्ये वरुणराजाला विनवणी करण्यात येत असल्याचे दिसुन येत आहे. ९ जुलै रोजी आषाढी एकादशी असून, पंढरपूरच्या विठूरायाची शेतकर्यांसाठी मेहरनजर होवू शकते, अशी विठ्ठल भक्तांची परंपरागत चालत आलेली आगाढ श्रद्धा आहे. त्यामुळे १0 जुलै नंतर मोसमी पावसाच्या साधक बाधक सरी कोसळतील व १२ जुलै आषाढी गुरू पोर्णिमेनंतर दमदार पाऊस होवून पेरण्या सुरू होतील. असा धर्मिक भावनेचा व हवामान शास्त्राचा अंदाज आहे.