विषम वातावरणात फुलविली स्ट्रॉबेरी शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 07:19 PM2020-12-15T19:19:57+5:302020-12-15T19:21:01+5:30
थंड हवेच्या ठिकाणी येणारे स्ट्रॉबेरी हे पीक मंगरूळपीर तालुक्यातील चांदई येथील सचिन मधुकर ठाकरे यांनी विषम वातावरणातही फुलविले आहे.
वाशिम : महाबळेश्वरसारख्या थंड हवेच्या ठिकाणी येणारे स्ट्रॉबेरी हे पीक मंगरूळपीर तालुक्यातील चांदई येथील सचिन मधुकर ठाकरे यांनी विषम वातावरणातही फुलविले आहे. अर्ध्या एकरात स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग यशस्वी करणाºया ठाकरे यांनी इतर शेतकºयांसमोर प्रेरणा निर्माण केली.
शेतीत नानाविध प्रयोग करीत अनेक शेतकरी चांगले उत्पादन घेत आहेत. स्ट्रॉबेरी हे फळ शक्यतो महाबळेश्वरसारख्या थंड हवेच्या ठिकाणी येणारे पीक आहे. स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग विषम वातावरणात यशस्वी करण्याचा संकल्प करीत सचिन ठाकरे यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रय चौधरी, तालुका कृषी अधिकारी रवीन्द्र इंगोले यांचे मार्गदर्शन घेतले. या कामी मंडळ कृषी अधिकारी आकाश इंगोले, कृषी सहायक सावतराव राऊत यांचेही मार्गदर्शन घेत अर्ध्या एकरात आंतरपीक म्हणून स्ट्रॉबेरी पीक घेतले. जवळपास १ लाख रुपये लागवड खर्च आला. एक दिवसआड खते व पाणी देणे, फवारणी करणे व अन्य मशागत करून ठाकरे यांनी स्ट्रॉबेरी शेती फुलविली आहे. महाबळेश्वरसारख्या ठिकाणी एका झाडापासून साधारणत: एक किलो उत्पादन मिळते. चांदई येथे एका झाडापासून ६०० ते ७०० ग्राम उत्पादन मिळते, असे सचिन ठाकरे यांनी सांगितले.