राममंदिर भूमिपूजनाच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागू; चोख बंदोबस्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 12:33 PM2020-08-05T12:33:39+5:302020-08-05T12:34:11+5:30
२४ तासासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले तसेच वाशिम शहरासह प्रमुख ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : उत्तर प्रदेशमधील अयोध्या येथे ५ आॅगस्ट रोजी श्रीराम मंदिर बांधकामाचा भूमिपूजन सोहळा होणार आहे. या काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी बुधवार, ५ आॅगस्ट रोजी २४ तासासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले तसेच वाशिम शहरासह प्रमुख ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला.
अयोध्या येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराम मंदिर बांधकामाचा भूमिपूजन सोहळा बुधवार, ५ आॅगस्ट रोजी होणार आहे. या दिवशी जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था कायम राहावी याकरीता ४ आॅगस्ट रोजी रात्री १२.०१ मिनिटापासून ते ५ आॅगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंत अशा २४ तासासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. या कालावधीत शस्त्रे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, लाठ्या किंवा काठ्या तसेच शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशा इतर कोणत्याही तीक्ष्ण वस्तू जवळ बाळगणे, कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड किंवा क्षेपणास्त्रे सोडायची किंवा फेकायची साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, व्यक्तीचे प्रेत अथवा मनुष्याकृती प्रतिमा यांचे बीभत्स प्रदर्शन करणे, वाद्य वाजविणे, जाहीरपणे प्रक्षोभक घोषणा करणे, राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्या कृतीमुळे राज्य प्रशासन उलथून पडण्याची प्रवृत्ती दिसून येईल, अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, सोंग आणणे, पत्ते खेळणे, कोणत्याही जिन्नस, वस्तू तयार करणे किंवा त्याचा लोकांमध्ये प्रसार, प्रचार करण्यास मनाई करण्यात आली आहे. अंत्ययात्रा, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी यांना हा आदेश लागू राहणार नाही.(प्रतिनिधी)