वाशिम : संचारबंदी शिथिल; फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 04:12 PM2020-05-06T16:12:08+5:302020-05-06T16:12:15+5:30
नागरिकांनी बाजारपेठेत एकच गर्दी केल्याने कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- नंदकिशोर नारे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हयात संचारबंदी शिथीलतेमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नसून खरेदीसाठी एकच गर्दी होत आहे. पोलीस कर्मचारी गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात अपयशी ठरत असून हतबल झाले आहेत. बँकासमोरही एकच घोळका होत असून याकडेही बँक प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे.
कोरोनाच्या पृष्ठभूमिवर जिल्हयात अनेक व्यवसाय उघडण्यास मर्यादित कालावधीत मुभा देण्यात आली आहे. मुभा मिळाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांसह शहरातील नागरिकांनी बाजारपेठेत एकच गर्दी केल्याने कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हाधिकारी यांनी याकडे विशेष लक्ष देऊन उपाय योजना करणे गरजेचे झाले आहे. जिल्हयात अनेक दुकानदारांनी गर्दी होउ नये, फिजिकल डिस्टंन्सिंगचे पालन व्हावे याकरिता व्यवस्था केली परंतु गर्दी मुळे केलेली व्यवस्थेला गर्दीत काहीच अर्थ दिसून येत नसल्याचे चित्र आहे. अनेकजण एकमेकाला चिकटून उभे राहत आहेत. गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे असून प्रशाासनानेही लक्ष देण्याची मागणी होत आहे.
मानोरा येथील बँकेला यात्रेचे स्वरुप
मानोरा : येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर दररोज गर्दी राहत असून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन अनेक दिवसांपासून होत नाही. याबाबत वरिष्ठांना कल्पनाही आहे परंतु दुर्लक्ष केल्या जात आहे. येथे कोणतेच फिजिकल डिस्टन्सिंगची व्यवस्था करण्यात आलेली दिसून येत नाही. नागरिक एकाला एक चिकटून रांगेत उभे राहत आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.