ग्राहकांनी जागृत होणे गरजेचे- बेडसे
By admin | Published: March 16, 2017 03:01 AM2017-03-16T03:01:12+5:302017-03-16T03:01:12+5:30
जागतिक ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रम.
वाशिम, दि. १५- ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा प्रमुख घटक आहे. ग्राहकांचे शोषण व फसवणूक रोखण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. या कामाला गती मिळण्यासाठी ग्राहकांनी जागृत होणे आवश्यक असल्याचे मत अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांनी व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालय व ग्राहक पंचायत यांच्यावतीने जागतिक ग्राहक दिनानिमित्त बुधवारी पार पडलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे वाशिम जिल्हाध्यक्ष प्रमोद गंडागुळे, सहसंघटक प्रा. सुधीर घोडचर, उ पजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल खंडागळे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेश गिरी, कैलास वानखडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. अपर जिल्हाधिकारी डॉ. बेडसे म्हणाले की, ग्राहकांची फसवणूक होण्याचे अनेक प्रकार पाहावयास मिळतात. अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून अन्न पदार्थात होणारी भेसळ रोखण्यासाठी प्रयत्न होतात, तसेच वैधमापन विभागामार्फतही ग्राहकांची फसवणूक केली जाऊ नये, याची काळजी घेतली जाते. ग्राहकांनी स्वत:ही याविषयी जागृत होऊन आपले हक्क व अधिकारांची माहिती घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले, तसेच अन्न व औषध प्रशासनामार्फत भेसळ रोखण्यासाठी धडक मोहीम उघडावी. यामध्ये होणार्या कारवाईला व्यापक प्रसिद्धी द्यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. प्रा. घोडचर यांनीही यावेळी अन्न पदार्थामधील भेसळ ओळखण्याच्या सोप्या पद्धती पीपीटीद्वारे समजावून सांगितल्या; तसेच गंडागुळे यांनी ग्राहकांच्या हितासाठी ग्राहक पंचायत करीत असलेल्या कार्यांची माहिती दिली, तसेच ग्राहक संरक्षण समितीची कार्यपद्धती विषद केली.