ग्राहकांना खाते क्रमांकाच्या आधारे बँकेत मिळणार प्रवेश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:08 AM2021-05-05T05:08:02+5:302021-05-05T05:08:02+5:30
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात १५ मे रोजीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ...
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात १५ मे रोजीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीच्या नियमावलीमध्ये अंशतः बदल करून आता जिल्ह्यातील सर्व ‘एटीएम’ सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच बँकांमधील गर्दी टाळण्यासाठी खाते क्रमांकाच्या शेवटच्या अंकानुसार ग्राहकांना प्रवेश देण्याचा आदेश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी ४ मे रोजी जारी केला. यासंदर्भात ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते, हे विशेष.
बँकेमध्ये गर्दी होत असल्याने कोरोनाची साखळी कशी तुटणार यााबाबत ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. याची दखल घेत गर्दी टाळण्यासाठी ४ मे रोजी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी सुधारित आदेश जारी केला.
या आदेशानुसार ग्राहकांना बँकेमध्ये प्रवेश देताना त्यांच्या खाते क्रमांकाच्या शेवटच्या अंकानुसार दिवस ठरवून देण्यात आले आहेत. खाते क्रमांकाचा शेवटचा अंक ० अथवा १ असल्यास सदर ग्राहकांना बँकेत केवळ सोमवारी प्रवेश मिळेल. त्याचप्रमाणे खाते क्रमांकाचा शेवटचा अंक २ किंवा ३ असल्यास मंगळवारी, ४ किंवा ५ असल्यास बुधवारी, ६ किंवा ७ असल्यास गुरुवारी आणि ८ किंवा ९ असल्यास शुक्रवारी बँकेत प्रवेश दिला जाईल. तसेच प्रत्येक महिन्यातील पहिला, तिसरा व पाचवा शनिवार बँकेच्या अंतर्गत कामकाजाचा दिवस राहील. त्यादिवशी ग्राहकांना त्यांच्या कामासाठी बँकेत प्रवेश असणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.