महामार्गाच्या कामात डेरेदार वृक्ष होताहेत जमीनदोस्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 02:00 PM2020-01-20T14:00:49+5:302020-01-20T14:00:58+5:30
रस्त्याच्या दुतर्फा नैसर्गिकरित्या वाढलेली आणि शेकडो वर्षांपासून वाटसरूंना सावली देणाऱ्या डेरेदार वृक्षांची सर्रास कत्तल केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : अकोला ते आर्णी या राष्ट्रीय महामार्गाचे काम अकोला, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये सद्या जोरासोरात सुरू आहे. महामार्ग निर्मितीदरम्यान मात्र जुन्या रस्त्याच्या दुतर्फा नैसर्गिकरित्या वाढलेली आणि शेकडो वर्षांपासून वाटसरूंना सावली देणाऱ्या डेरेदार वृक्षांची सर्रास कत्तल केली जात आहे. यामुळे वृक्षप्रेमींमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
मानोराकडून दिग्रस, मंगरूळपीर आणि कारंजाकडे जाणाºया रस्त्याच्या दुतर्फा हजारो वृक्षांची लागवड त्यावेळच्या रस्ता बांधकाम करणाºया यंत्रणेने करून रस्त्यावरून होणाºया वायू प्रदूषणाला आळा घालण्याचा दुरदर्शी उपाय करण्यात आला. अकोला ते आर्णी या राष्ट्रीय महामार्ग निर्मितीदरम्यान मात्र तीच शेकडो वर्षांपासून उभी असलेली झाडे तोडून टाकली जात असल्याने रस्ता बोडखा झाल्याचे दिसून येत आहे.
मनोरा शहरात अनेक वर्षे वाटसरूंना शितल छाया देणारे स्टेट बँकेनजिकचे डेरेदार निमवृक्षही या कामादरम्यान कापले जाणार असल्याने वृक्षप्रेमींमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
अकोला ते आर्णी या राष्ट्रीय महामार्ग निर्मितीदरम्यान रस्ता रुंदीकरण करण्यासाठी अडचणीचे ठरत असलेले वृक्ष तोडण्याची रितसर परवानगी संबधित कंत्राटदारांनी वनविभागाकडून घेतलेली आहे. रस्त्याची कामे पूर्ण झाल्यानंतर तेवढीच झाडे रस्त्याच्या कडेला नव्याने लावण्यात यावीत, असे बंधन कंत्राटदारांना घालून देण्यात आले आहे. तथापि, तोडलेली झाडे लहान-मोठ्या स्वरूपातील आहेत. नव्याने लावण्यात येणारी झाडे मोठी व्हायला बरीच वर्षे लागणार आहेत; मात्र त्यास सद्यातरी कुठलाच पर्याय नाही.
- चेतन राठोड
वनपरिक्षेत्र अधिकारी, वनविभाग, मानोरा