सायकलींगमध्ये तीन विद्यार्थीनी विभागीय स्तरावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 01:47 PM2017-10-13T13:47:27+5:302017-10-13T13:47:53+5:30
वाशीम : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे विद्यमाने, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वाशीम व्दारा स्थानिक जिल्हा क्रीडा मैदानात झालेल्या जिल्हास्तरीय शालेय सायकलींग क्रीडा स्पर्धेत स्थानिक राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेच्या तीन विद्यार्थीनींनी चमकदार कामगिरी करुन विभागीय स्तरावर झेप घेतली.
यामध्ये १४ वर्ष वयोगटात कोमल दिपक जितकर हिने ७ किमी. सायकलींग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तर १७ वर्ष वयोगटात निकिता गजानन मापारी हिने प्रथम क्रमांक व प्रतिक्षा अनिल देशमुख हिने व्दितीय क्रमांक मिळवून यश संपादन केले. या तीन्ही खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे त्या विभागीय स्तरावर खेळविल्या जाणार्या सायकलींग स्पर्धेसाठी पात्र ठरल्या. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक विष्णू इढोळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थीनींनी मिळविलेल्या घवघवीत यशाबद्दल वाशीम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. मधुकरराव अनसिंगकर, उपाध्यक्ष दत्तात्रय देशमुख, सचिव डॉ. प्रदीप फाटक, सहसचिव डॉ. सुनिता घुडे, सदस्य धनंजय खरे, विजयाताई देशपांडे, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती कुलकर्णी, उपमुख्याध्यापक सुरेश खरावन, पर्यवेक्षिका शिला वजीरे, क्रीडा शिक्षक विष्णू इढोळे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी या तीन्ही खेळाडूंचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.