‘आईला मारहाण करून पप्पांनी तीला झोक्याला बांधले’ - चिमुकल्या श्रद्धाचे बयाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 05:40 PM2018-05-26T17:40:09+5:302018-05-26T17:40:09+5:30
शिरपूरजैन (वाशिम) : ‘आधी गालात झापडा मारून त्यानंतर माझ्या आईला पप्पांनीच झोक्याला बांधले’, असे बयाण चार वर्षे वयाच्या चिमुकल्या श्रद्धाने दिल्यामुळे मृतक सुनिताची हत्या तिचा पती धनंजय बोडखे यानेच केली असावी, असा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
शिरपूरजैन (वाशिम) : ‘आधी गालात झापडा मारून त्यानंतर माझ्या आईला पप्पांनीच झोक्याला बांधले’, असे बयाण चार वर्षे वयाच्या चिमुकल्या श्रद्धाने दिल्यामुळे मृतक सुनिताची हत्या तिचा पती धनंजय बोडखे यानेच केली असावी, असा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे मात्र ज्या आईच्या उदरातून जन्म घेतला, तीच आज या जगात नाही आणि तीला मारणारा स्वत:चा बापही गुन्हा सिद्ध झाल्यास पुढचे अनेक वर्षे कारागृहात जाणार असल्याने श्रद्धासह अडीच वर्षे वयाची सलोनी आणि सहा महिने वयाची आराध्या अशा तीघी बहिणी माय-बापाच्या प्रेमाला मुकणार आहेत. या ह्रदयद्रावक घटनेप्रती समाजातील सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
२४ मे २०१८ रोजी घडलेल्या या घटनेची अधिक माहिती अशी, की शिरपूर येथील जगन्नाथ काठोळे यांची मुलगी सुनिता हिचा विवाह ५ वर्षांपूर्वी भापुर (ता.रिसोड) येथील धनंजय बोडखे याच्याशी झाला होता. दरम्यानच्या काळात या दाम्पत्यास तीन गोंडस मुली झाल्या. मात्र, ‘तुझ्या पोटी मुलीच का जन्माला येतात’, असा प्रश्न वारंवार करून सुनिताचा पती धनंजय हा तिला नेहमीच मारहाण करून त्रास द्यायचा. दरम्यान, मुलीला होत असलेल्या त्रासाची दखल घेवून सुनिताचे वडिल जगन्नाथ काठोळे यांनी तिला व तिच्या पतीला शिरपूरमध्ये वास्तव्यास आणले. याठिकाणी हे दाम्पत्य आपल्या तीन मुलींसह धोंडू तागड यांच्या घराच्या दुसºया मजल्यावरील खोलीत भाड्याने वास्तव्य करित होते. अशात २४ मे रोजी सायंकाळी ७ वाजता सुनिताचा मृतदेह हा, तिच्या सहा महिने वयाच्या मुलीसाठी घरात बांधण्यात आलेल्या झोक्याला गळफास लागलेल्या स्थितीत आढळून आला. सुनिताचा पती धनंजयने ही आत्महत्या असल्याचे भासविण्याचा पूर्ण प्रयत्न करून तेथून तत्काळ पळ काढला. दरम्यान, ही आत्महत्या नसून धनंजयनेच माझ्या मुलीची हत्या केल्याची तक्रार सुनिताचे वडिल जगन्नाथ काठोळे यांनी पोलिसांत दाखल केली. त्यावरून २५ मे रोजी धनंजयविरूद्ध कलम ४९८ ‘अ’, ३०२ भादंविअन्वये गुन्हा दाखल झाला. याचदिवशी सायंकाळी पोलिसांनी सुनिताची चार वर्षे वयाची मुलगी श्रद्धा हिचेही बयाण नोंदविले. त्यात तिने ‘आधी गालावर झापडा मारून पप्पांनीच आईला झोक्याला बांधले’, असे नमूद केले. यास तपास अधिकारी तथा पोलिस उपनिरीक्षक मुपडे यांनीही दुजोरा दिला. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच सर्व बाबी स्पष्ट होतील, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, समाजमन सुन्न करणाºया या घटनेमुळे मात्र खेळण्या-बागडण्याच्या वयात असलेल्या तीन चिमुकल्या मुली कायमच्या अनाथ होण्याच्या उंबरठ्याप्रत पोहचल्याने याप्रती सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागात आजही ‘मुलगाच हवा’!
शिरपूरमध्ये घडलेल्या या घटनेमागे सुनिताच्या पोटी तीन मुलीच आल्याचे आणि मुलगा नसल्याचे एक मुख्य कारण असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे. यावरून ग्रामीण भागातील अनेक मंडळी आजही ‘मुलगाच हवा’, या बुरसटलेल्या मानसिकतेतून बाहेर पडली नसल्याचे सिद्ध होत आहे. शासनस्तरावरून मोठा गाजावाजा करून राबविल्या जाणाºया ‘बेटी बचाव’, या मोहिमेचेही विशेष फलित अद्याप झाले नसल्याचे या घटनेवरून अधोरेखीत होत असल्याची चर्चा होत आहे.