धरणांची पातळी चिंताजनक; सहाही तालुक्यांत ‘पाणी संकट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 02:29 PM2019-07-28T14:29:06+5:302019-07-28T14:30:24+5:30
सहाही तालुक्यांची स्थिती गंभीर असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांनी शनिवारी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धोक्यात सापडलेली खरीप हंगामातील पिके तरारली आहेत; परंतु धरणांच्या पाणीपातळीत वाढ झालेली नाही. काही धरणांमधील शिल्लक असलेल्या मृत जलसाठ्यातूनच नागरिकांना पाणी पुरविले जात असून याबाबतीत सहाही तालुक्यांची स्थिती गंभीर असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांनी शनिवारी दिली.
यंदाच्या पावसाळ्यात जून महिना पूर्णत: कोरडा गेला. तसेच जुलै महिनाही अर्धाअधिक उलटून गेल्यानंतरही पावसाचा थांगपत्ता नव्हता. यामुळे खरीप हंगामातील पिके संकटात सापडण्यासोबतच उन्हाळ्यात उद्भवलेली प्रखर पाणीटंचाई देखील कायम होती. दरम्यान, २५ जुलैपासून वातावरणात बदल झाला असून पाऊस होत आहे. यामुळे पाण्याअभावी खरीप हंगामातील पिके धोक्यातून बाहेर पडली आहेत; मात्र रिमझिम स्वरूपातील पावसामुळे जिल्ह्यातील ३ मध्यम आणि १३१ लघू प्रकल्पांच्या पाणीपातळीत कुठलीही वाढ झालेली नाही.
मालेगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चाकातिर्थ प्रकल्पातील पाणी कुरळा धरणाच्या विहिरीत सोडून मालेगावकरांची तहान भागविण्यात येत आहे. वाशिम, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा आणि रिसोड या पाच शहरांसह ग्रामीण भागात मात्र पाणीटंचाईचा प्रश्न कायम आहे. एकबुर्जी प्रकल्पात आजमितीस केवळ एक ते दीड टक्के जलसाठा शिल्लक आहे. दरम्यान, जोपर्यंत मोठा पाऊस होवून शहरांतर्गत नाल्या वाहत्या होत नाहीत, तोपर्यंत धरणे देखील भरणार नाहीत, अशी एकंदरित स्थिती आहे.
बॅरेजच्या पाण्याचा पर्याय खुला
गतवर्षी वाशिम नगर परिषदेने पैनगंगा नदीवरील कोकलगाव बॅरेजमध्ये अडविले जाणारे पाणी एकबुर्जी जलाशयापर्यंत आणण्याकरिता पाईपलाईन टाकण्यासह अन्य सुविधांची उभारणी केलेली आहे. दरम्यान, सद्या तसेच यापुढे नगर परिषदेकडून पुढाकार घेतल्यास पैनगंगेचे पाणी कोकलगाव बॅरेजमध्ये अडवून ते एकबुर्जी प्रकल्पात सोडण्यास परवानगी दिली जाईल. धरणात पाणी साठविण्यासाठी हा पर्याय खुला असून नगर परिषदेने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
यंदाच्या पावसाळ्यात जुलै महिन्याच्या प्रारंभी काही प्रमाणात पाऊस झाला; मात्र त्यानंतर मोठ्या प्रमाणात उन्ह पडल्याने धरणांची पाणीपातळी वाढली नाही. गेल्या दोन ते तीन दिवसात पाऊस झाला; परंतु तो देखील मोठ्या स्वरूपातील नसल्याने आहे त्या परिस्थितीत कुठलाही विशेष फरक पडलेला नाही.
- प्रशांत बोरसे
कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग