वाशिम जिल्ह्यात १५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 01:25 PM2020-09-05T13:25:34+5:302020-09-05T13:25:45+5:30
सोयाबीनच्या पिकाचे १२ हजारांहून अधिक, तर मुग आणि उडिदाचे मिळून ३ हजार ५०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
वाशिम : जिल्ह्यात यंदा आॅगस्ट महिन्यात आलेल्या संततधार पावसामुळे १५ हजार पेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रातील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात सोयाबीनच्या पिकाचे १२ हजारांहून अधिक, तर मुग आणि उडिदाचे मिळून ३ हजार ५०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
वाशिम जिल्ह्यात २.९३ लक्ष हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी झाली आहे. हे पीक २० ते २५ दिवसाचे झाल्यानंतर यावर उंटअळी, चक्रीभुंगा, खोडमाशी या किडींचा अल्प प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आला. या किडीवर नियंत्रणासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शनही केले. त्यानंतर १० आॅगस्टपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण व संततधार पाऊस पडल्याने सोयाबीन पिकावर खोडावरील, शेंगावरील करपा रोग, तसेच पाने पिवळी पडण्याचे प्रकार दिसून आला. करपा रोगाच्या नियंत्रणासाठी बुरशी नाशकाची फवारणी करण्याबाबत कृषी विभागाने मार्गदर्शन केले. त्यानंतरही सततच्या पावसामुळे तब्बल १२ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. उर्वरीत सोयाबीन पिकाची स्थिती समाधानकारक आहे. त्याशिवाय जिल्ह्यात यंदा ६६४३ हेक्टर क्षेत्रावर मुग पिकाची पेरणी झाली. या पिकाच्या शेंगा परिपक्व होत असतानाच पावसाने रिपरिप सुरू केली. त्यामुळे शेंगामध्ये कोंब फुटून या पिकाचा दर्जा खालावला. कृषी विभागाच्या अंदाजानुसार सततच्या पावसामुळे एकूण क्षेत्रापैकी ४० टक्के क्षेत्रावरील अर्थात २ हजारापेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रातील मुग पिकाचे नुकसान झाले आहे, तर जिल्ह्यात ९५४३ हेक्टर क्षेत्रावर उडिद पिकाची पेरणी झाली असताना आणि हे पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना सततच्या पावसामुळे जमिनीत पाणी साचून या पिकावर करपा रोगाचा प्रादूर्भाव आढळुन आला. त्यात १० आॅगस्टपासून आलेल्या संततधार पावसामुळे जवळपास १ हजार पेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रातील उडिद पिकाला फटका बसला.
यंदा आॅगस्ट महिन्यात १० तारखेपासून पडलेल्या संततधार पावसामुळे खरीप पिकांना प्रामुख्याने सोयाबीन, उडिद आणि मूग पिकाला फटका बसला आहे. या पिकांच्या नुकसानाची पाहणी करण्याचे निर्देश अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार तिन्ही पिके मिळून जवळपास १४ ते १५ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
-एस. एम. तोटावार,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,वाशिम