हद्दवाढ झालेल्या भागांत विकासकामांमध्ये दुजाभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 09:21 AM2021-02-05T09:21:31+5:302021-02-05T09:21:31+5:30
कारंजा लाड : नगर परिषदेअंतर्गत झालेल्या हद्दवाढीच्या क्षेत्रात विकासकामांबाबत दुजाभाव करण्यात येत असल्याचा आरोप माजी उपसरपंच आणि प्रियदर्शिनी कॉलनीमधील ...
कारंजा लाड : नगर परिषदेअंतर्गत झालेल्या हद्दवाढीच्या क्षेत्रात विकासकामांबाबत दुजाभाव करण्यात येत असल्याचा आरोप माजी उपसरपंच आणि प्रियदर्शिनी कॉलनीमधील रहिवासी प्रशांत ठाकरे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे सोमवारी निवेदनाद्वारे केला आहे.
निवेदनात असे नमूद आहे की, प्रशांत ठाकरे हे बायपास परिसरात गेल्या २४ वर्षांपासून रहिवासी असून, हा भाग महाराष्ट्र शासनाच्या १९ जुलै २०१७ च्या अधिसुचनेद्वारे कारंजा नगर परिषदेची हद्दवाढ होऊन कारंजा नगर परिषदेच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आला. शहराची नव्याने हद्दवाढी झाल्यामुळे नैसर्गिक न्यायाने या भागाचा विकास होण्यासाठी शासनाद्वारे जवळपास १६ कोटी रुपयांचा निधी संबंधित यंत्रणेला वितरीत करण्यात आला आहे. तथापि, निधी येऊन सुद्धा कामाचे नियोजन करण्यात आले नाही, तसेच नगर परिषदेकडून कोणत्याही प्रकारचे सर्वेक्षण करण्यात आले नाही, तर काही भागांत आपल्या सोयीनुसार विकास कामे केली जात आहेत. यातून दुजाभाव दिसत आहे. त्यामुळे विकासकामांपासून वंचित असलेल्या भागांतही त्वरीत विकासकामास सुरुवात करावी अन्यथा उपोषणाचा मार्ग पत्करू, असा इशाराही प्रशांत ठाकरे यांनी दिला आहे.
बाॅक्स : या वसाहती विकासापासून वंचित
हद्दवाढीनंतर कारंजा नगर परिषदेच्या हद्दीत समाविष्ट झालेले तुषारनगर, गढवाले टाऊन, प्रशांतनगर, वेदांतनगर, अंकुशनगर, स्वस्तिकनगर, मराठा सेवा संघ काॅलनी, प्रियदर्शनी काॅलनी, निवारा काॅलनी, सुदर्शन काॅलनी, शांतीनगर, माणकनगर, गणपतीनगर, ममतानगर, गायकवाडनगर, यशोदानगर, गुरूदेव नगर, गुरूदेवनगर, वनदेवीनगर, बालाजीनगर, यादगारनगर, मुनलाइट काॅलनी, जागृतीनगर, रमाईनगर, शिंदेनगर, शिक्षक काॅलनी आदी भागात अद्याप नगर परिषदेकडून विकासकामे झालेली नाहीत.