नुकसानग्रस्त ६८ हजार शेतकरी मदतीपासून वंचित

By सुनील काकडे | Published: May 13, 2023 05:56 PM2023-05-13T17:56:37+5:302023-05-13T17:56:50+5:30

पिकांची अतोनात हानी : नैसर्गिक संकटांपुढे बळीराजा हतबल

Damaged 68 thousand farmers deprived of help | नुकसानग्रस्त ६८ हजार शेतकरी मदतीपासून वंचित

नुकसानग्रस्त ६८ हजार शेतकरी मदतीपासून वंचित

googlenewsNext

वाशिम : एरव्ही दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापासून कडक ऊन्ह तापते. यंदा मात्र वातावरणात बदल होऊन एप्रिलच्या अखेरपर्यंत अधूनमधून ढगाळी वातावरण निर्माण होण्यासह अवकाळी पाऊस कोसळला. यादरम्यान गारपीट होऊन पिकांची अतोनात हानी झाली. त्यापूर्वीही निसर्गाने लहरीपणा दाखविल्याने वर्षभरात २ लाख ४० हजार ६७५ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यापैकी १ लाख ७२ हजार ६४२ शेतकऱ्यांना मदत मिळाली; तर ६८ हजार ३३ शेतकरी अद्याप मदतीपासून वंचित आहेत.

जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात गहू, मूग, तूर, उडिद, कापूस, सोयाबीन, ज्वारी आदी पिके घेतली जातात. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे, त्यांनी विविध फळांच्या बागा विकसीत केल्या; तर काही शेतकऱ्यांनी भाजीपाला उत्पादनाच्या माध्यमातून आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र, नैसर्गिक संकटांपुढे शेतकरी पुरते हतबल होत आहेत. यंदा तर भर उन्हाळ्यात ढगाळी वातावरण कायम राहण्यासह जोरदार स्वरूपात अवकाळी पाऊस कोसळला. यादरम्यान मोठ्या प्रमाणात गारपीट देखील झाल्याने प्रामुख्याने फळबागा आणि भाजीपालावर्गीय पिकांना जबर फटका बसला. काही शेतकऱ्यांच्या शेतातील गहू पिकाचेही यामुळे नुकसान झाले. त्यापूर्वीही निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या विविध पिकांचे नुकसान झाले. मात्र, मदत मिळण्यास विलंब होत असल्याने त्यांच्यातून नाराजी व्यक्त होत आहे.

१ लाख ७२ हजार शेतकऱ्यांना मिळाली मदत
जुलै २०२२ ते ८ मे २०२३ या कालावधीत अतिवृष्टी, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील २ लाख ४० हजार ६७५ शेतकऱ्यांच्या १ लाख ९३ हजार ६२७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे दर्शवून नुकसान भरपाईपोटी २६५ कोटी ४५ लाख रुपयांची आवश्यकता असल्याचा अहवाल शासनाकडे पाठविला. त्यापैकी आतापर्यंत १ लाख ७२ हजार ६४२ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात १९७ कोटी २३ लाख रुपये वर्ग करण्यात आले; मात्र ६८ हजार ३३ शेतकरी मदतीपासून अद्याप वंचित असून ६८ कोटी २२ लाखांचा निधी संबंधितांच्या बॅंक खात्यात जमा होणे आवश्यक आहे.


जुलै २०२२ पासून ८ मे २०२३ पर्यंत विविध स्वरूपातील नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त १ लाख ७२ हजार ६४२ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात मदतनिधी जमा करण्यात आला असून उर्वरित ६८ हजार ३३ शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
- एस.एम. तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Web Title: Damaged 68 thousand farmers deprived of help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी