वाशिम जिल्ह्यातील धरणांच्या टक्केवारीत वाढ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 02:39 PM2019-09-27T14:39:55+5:302019-09-27T14:40:29+5:30
नदी-नाले दुथडी भरून वाहण्यासोबतच अनेक ठिकाणचे लघूसिंचन प्रकल्प तुडूंब झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात बुधवारी सर्वदूर जोरदार पाऊस कोसळला. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहायला लागले असून सिंचन प्रकल्पांच्या टक्केवारीतही विक्रमी वाढ झाली आहे. खरीप हंगामातील पिकांचे मात्र या पावसामुळे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमध्ये एकबुर्जी, सोनल व अडाण असे तीन मध्यम प्रकल्प असून १३१ लघूसिंचन प्रकल्प आहेत. दरम्यान, यंदा अर्धाअधिक पावसाळा उलटल्यानंतरही अपेक्षित पर्जन्यमान न झाल्याने सिंचन प्रकल्पांमध्येही पाणीसाठा झालेला नव्हता. यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्यासोबतच आगामी रब्बी हंगामात सिंचनासाठी पाणी मिळण्याची आशाही धुसर झाल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. अशात गत काही दिवसांपासून जिल्ह्यात समाधानकारक पाऊस सुरू असून बुधवारी दिवसभर व रात्रीलाही जोरदार स्वरूपात पाऊस कोसळला. गुरूवारीही काहीवेळ चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहण्यासोबतच अनेक ठिकाणचे लघूसिंचन प्रकल्प तुडूंब झाले आहेत.
जिल्ह्यातील तीनही मध्यम प्रकल्पांनी देखील ६० ते ६५ टक्क्यांची पातळी ओलांडली आहे. आगामी काही दिवस पावसाचे हे चित्र असेच कायम राहिल्यास संपूर्ण जिल्हा पाणीदार होण्यास वेळ लागणार नाही, असा सूर उमटत आहे.