वाशिम बाजार समितीवर सभापतीपदी दामुअण्णा गोटे तर उपसभापतीपदी गोवर्धन चव्हाण!
By संतोष वानखडे | Published: May 30, 2023 01:16 PM2023-05-30T13:16:10+5:302023-05-30T13:16:41+5:30
महाविकास आघाडीचा झेंडा : गोटे घराण्याचे वर्चस्व कायम
वाशिम : जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीनंतर अंतिम टप्प्यात ३० मे रोजी वाशिम बाजार समितीच्या सभापती, उपसभापती पदासाठी निवडणूक झाली असून, सभापतीपदी दामुअण्णा गोटे तर उपसभापतीपदी गोवर्धन चव्हाण यांची अविरोध निवड झाली. शेतकरी विकास पॅनलचे सभापती, उपसभापती झाल्याने वाशिम बाजार समितीवर गोटे घराण्याने सत्ता कायम ठेवण्यात यश मिळविले.
१८ संचालक पदाच्या वाशिम बाजार समितीत काॅंग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे), वंचित बहुजन आघाडी व मित्र पक्ष (महायुती) प्रणित शेतकरी विकास पॅनलचे नऊ संचालक निवडून आल्याने बहुमतासाठी केवळ एका संचालकाची गरज आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काॅंग्रेस, शिवसेनेचा (उद्धव ठाकरे) दुसरा गट प्रणित शेतकरी सहकार पॅनलचे सहा संचालक निवडून आल्याने सत्ता स्थापनेसाठी त्यांना चार संचालकांची जुळवाजूळव करावी लागणार होती. दोन्ही पॅनलकडून सत्ता स्थापनेसाठी संचालकांची जुळवाजूळव सुरू असताना, निवडणूकीच्या पूर्वरात्रीला आपसी तडजोड करण्यावर एकमत झाले.
सुरूवातीच्या दोन वर्षासाठी शेतकरी विकास पॅनलचे सभापती व उपसभापती आणि त्यानंतर दीड वर्षासाठी शेतकरी सहकार पॅनलला संधी देण्याचे ठरले. त्यानुसार ३० मे रोजी सभापती पदासाठी शेतकरी विकास पॅनलचे दामुअण्णा गोटे व उपसभापती पदासाठी गोवर्धन चव्हाण यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने दोघांचीही निवड अविरोध झाल्याचे पिठासीन अधिकाऱ्यांनी जाहिर केले. वाशिम बाजार समितीवरही महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे.