वाशिम पंचायत समितीतील १५ कर्मचा-यांची दांडी
By admin | Published: November 28, 2015 02:45 AM2015-11-28T02:45:08+5:302015-11-28T02:45:08+5:30
सभापती व सदस्यांनी दिलेल्या अचानक भेटीत कर्मचा-यांची अनुपस्थिती उघडकीस.
वाशिम : पंचायत समितीमध्ये अधिकारी व कर्मचारी हजरच राहत नसल्याच्या प्राप्त तक्रारीवरुन सभापती व सदस्यांनी अचानक भेट दिली असता, तब्बल १५ कर्मचारी गैरहजर आढळून आल्याचे २७ नोव्हेंबर रोजी उघडकीस आले. २७ नोव्हेंबर रोजी सभापती वीरेंद्र विनायक देशमुख व पंचायत समिती सदस्य यांनी दुपारी ३.३0 वाजता अचानक पंचायत समितीमध्ये किती अधिकारी व कर्मचारी हजर आहेत, याची पाहणी करण्याचे ठरविले. पंचायत समितीमधील प्रत्येक कक्षाला भेट दिली असता, तब्बल १५ कर्मचारी गैरहजर आढळून आले. गैरहजर कर्मचार्यांमध्ये व्ही.एच.प्रधान, मनोज चव्हाण, गणेश भांदूर्गे, राजू उलेमाले, माळेकर, शिक्षण विभागातील एस.बी.सरनाईक, घुगे, नाचोने, दरोकर, देवळे, महाले, एस.एस.मोरे, आ.गो. भांदूर्गे , ए.टी.तायडे , करवते, यांचा समावेश आहे. पंचायत समितीमध्ये कर्मचारी हजर नसल्याबाबत पाहणी करण्याकरिता पंचायत समितीचे सभापती व्ही.व्ही.देशमुख, सदस्य भ.द.ढोके, मणकर्णा कुंडलीक वानखेडे, चंदन मदनसिंग राठोड, जनार्दन विक्रम सोनुने, आशा उत्तम पायघन, अर्चना मिलिंद इंगोले या पंचायत समिती सदस्यांसह अनेकांची उपस्थिती होती.