घंटागाडी कामगारांवर उपासमारीची पाळी
By admin | Published: March 3, 2017 12:53 AM2017-03-03T00:53:19+5:302017-03-03T00:53:19+5:30
मंगरुळपीरमधील वास्तव: पाच महिन्यांपासून मानधन थकीत
मंगरुळपीर, दि.२ : शहरभरातील कचरा गोळा करून स्वच्छता अभियानासाठी मोठा हातभार लावणाऱ्या घंटागाडी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. मंगरुळपीर नगर पालिकेंतर्गत कार्यरत घंटागाडी कर्मचाऱ्यांना गेल्या पाच महिन्यांपासून मानधनच मिळाले नाही. त्यामुळे स्थानिक पालिका प्रशासन आणि संबंधित कंत्राटदार आपल्या जबाबदारीबाबत किती गंभीर आहेत, त्याची प्रचिती येत आहे.
मंगरुळपीर शहरातील १७ प्रभागांतील कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी स्थानिक नगर पालिकेच्यावतीने घंटागाडीचे कंत्राट एका संस्थेला दिले आहे. या संस्थेमार्फत १७ कामगारांची नियुक्ती करून गेल्या वर्ष दोन वर्षांपासून शहरातील कचरा व्यवस्थापनाचे काम करण्यात येत आहे. घंटागाडी कामगार गाडीवरची घंटी वाजवर या गल्लीतुन त्या गल्लीत फिरत कचरा गोळा करतात. शहरभरातील गोळा झालेला हा कचरा शहराबाहेर तयार करण्यात आलेल्या डम्पिंग ग्राऊंडवर टाकून शहराची स्वच्छता राखण्यात ते मोलाची भूमिका वठवितात. या कामासाठी त्यांना जेमतेम शंभर रुपये रोजप्रमाणे मासिक तीन हजार रुपये वेतन देण्यात येते. आता मागील पाच महिन्यांपासून या कामगारांचे वेतन थकले आहे. यामुळे त्यांना कुटुंबियांसह दिवाळीचा आनंद घेता आला नाहीच शिवाय त्या दरम्यान आणि त्यानंतर साजरे झालेले सणवारही साजरे करता आले नाहीत. घंटागाडी घरोघर, गल्लोगल्ली फिरवून केलेल्या कामाचा मोबदलाच मिळत नसेल, तर काम करून फायदाच काय, असा प्रश्न घंटागाडी कामगारांनी उपस्थित केला आहे. एकिकडे शासन संपूर्ण स्वक्ष्च्छता अभियान यशस्वी करण्यासाठी विविध प्रयत्न करीत असताना त्याच अभियानाचा घटक असलेल्या घंटागाडी कामगारांवर उपासमाळीचही पाळी यावी ही एक मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल.
खमंगरुळपीर पालिकेचा प्रभार आपल्याकडे असला तरी, देयकांबाबत आपल्याला माहिती नाही. या ठिकाणी नियमित मुख्याधिकारी वाहूरवाघ रुजू झाल्यानंतर ते घंटागाडी कर्मचाऱ्यांची समस्या तात्काळ सोडवतील. दरम्यान, यासाठी आपणही प्रयत्न करीत आहोत.
-प्रमोद वानखडे, मुख्याधिकारी मंगरुळपीर
घंटागाडी कामगारांना कामाचा मोबदला मिळावा म्हणून १५ दिवसांपूर्वीच पालिकेकडे देयके तयार करून सादर केली आहेत; परंतु त्याला मंजुरी मिळाली नाही. त्याची पूर्तता होताच सर्वच कामगारांचे वेतन तात्काळ चुकविण्यात येईल. कोणत्याही कामगाराचे वेतन अकारण थकविले नाही.
-गौतम श्रृंगारे, घंटागाडी कं त्राटदार मंगरुळपीर