कोरोनामुळे अंध व्यक्तींसमोर अंधार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:30 AM2021-05-28T04:30:02+5:302021-05-28T04:30:02+5:30
कोरोनाच्या संकटावर नियंत्रण मिळविण्याकरिता प्रशासकीय पातळीवरून विविध स्वरूपांतील उपाययोजना आखण्यात आल्या. प्रामुख्याने गर्दी होणाऱ्या सर्वच सांस्कृतिक, जनजागृतीपर कार्यक्रमांवर गेल्या ...
कोरोनाच्या संकटावर नियंत्रण मिळविण्याकरिता प्रशासकीय पातळीवरून विविध स्वरूपांतील उपाययोजना आखण्यात आल्या. प्रामुख्याने गर्दी होणाऱ्या सर्वच सांस्कृतिक, जनजागृतीपर कार्यक्रमांवर गेल्या वर्षभरापासून सक्तीने बंदी लादण्यात आलेली आहे. त्यामुळे इतर कलावंतांसोबतच दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या गुणी कलावंतांचा रोजगारही हिरावला गेला. वाशिम तालुक्यातील केकतउमरा येथे ‘चेतन सेवांकुर ऑर्केस्ट्रा’शी जुळलेल्या १० ते १२ नेत्रहिन मुलांवर यामुळे आर्थिक संकट ओढावले आहे.
सर्व काही सुरळीत असताना समाजातील अनेकांकडून अंधांना सहानुभूती म्हणून मदतीचा हात दिला जायचा. तो प्रकारही गेल्या काही दिवसांत बंद झाल्याने अंध व्यक्तींसमोर पूर्णत: अंधार पसरल्याचे दिसून येत आहे.
...................
(बॉक्स)
जिल्ह्यात १० पेक्षा अधिक अंध पॉझिटिव्ह
जिल्ह्यात गेल्या १३ महिन्यांपासून कोरोनाच्या संकटाने थैमान घातलेले आहे. संसर्गाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत १० पेक्षा अधिक अंध व्यक्तींचाही अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला. त्यांनी लीलया संकटावर मात करून कोरोनातून मुक्ती मिळविली. कोरोनाने अंध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची एकही घटना घडलेली नाही.
....................
(बॉक्स)
जगायचे कसे?
दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या व्यक्ती शारीरिक श्रम करण्यास सक्षम नसतात. कुठलेही साधे सोपे काम करून उपजीविका भागावी, यावरच त्यांचा भर असतो. असे असताना कोरोनामुळे कुठलेच काम उपलब्ध नसल्याने जगायचे कसे, हाच एक मात्र प्रश्न त्यांच्यासमक्ष उभा ठाकला आहे.
..............
(कोट)
आधारही एकमेकांचाच !
कोरोनापूर्वी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये बोलावणे यायचे. विविध प्रकारचे वाद्य वाजविण्यासह गायनाच्या माध्यमातून बऱ्यापैकी मिळकत व्हायची. कोरोनाच्या संकटामुळे मात्र कार्यक्रम बंद असल्याने रोजगार हिरावला गेला आहे.
- चेतन उचितकर
..............
‘चेतन सेवांकुर ऑर्केस्ट्रा’च्या माध्यमातून जगण्याचा नवा आधार मिळाला होता; मात्र गेल्या काही महिन्यांपासून रोजगाराचे कुठलेच साधन उपलब्ध नाही. त्यामुळे आर्थिक संकट कोसळले आहे. आता तर एकमेकांचाच आधार आहे. परिस्थिती सुरळीत व्हावी, अशी अपेक्षा आहे.
- दशरथ जोगदंड
............
कोरोनाचे संकट कायमचे हद्दपार होऊन परिस्थिती पुन्हा पूर्वीसारखी व्हावी, ही देवाकडे प्रार्थना आहे. गेल्या वर्षभरापासून या संकटामुळे हाताला काम राहिलेले नाही. पूर्वीसारखी कोणी आस्थेने विचारपूसही करत नाही. स्वावलंबी अंधांसमोर यामुळे खरेच अंधार पसरला आहे.
- कैलाश पानबुडे
................
कोरोनाच्या संकटामुळे उद्योगधंदे ठप्प होण्यासह अनेकांचा रोजगार कायमचा हिरावला गेला. समाजातील अनेक अंध व्यक्ती स्वाभिमान बाळगून आहेत. ते भीक मागत नाहीत; तर रोजगार मागत आहेत. प्रशासकीय यंत्रणेने अंधांच्या आयुष्यात पुन्हा उजेड आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, एवढीच अपेक्षा आहे.
- अविनाश मारशेटवार, सामाजिक कार्यकर्ते