पालकाच्या वृक्ष संवर्धनातून कन्या होणार लखपती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 05:48 PM2019-06-30T17:48:06+5:302019-06-30T17:49:03+5:30
मालेगाव: पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मालेगाव तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायतने अतिशय आदर्श आणि स्तुत्य अशी कन्या वनसमृद्धी योजना यंदाच्या वर्षापासून राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
- अमोल कल्याणकर
मालेगाव: पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मालेगाव तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायतने अतिशय आदर्श आणि स्तुत्य अशी कन्या वनसमृद्धी योजना यंदाच्या वर्षापासून राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत कन्यारत्न असलेल्या पालकांनी १० वृक्षांची लागवड करून ते १९ वर्षे जगविल्यास त्यांच्या कन्येला १९ व्या वाढदिवशी एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत यंदा १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ दरम्यान जन्मलेल्या ४ कन्यांच्या पालकांची निवड होईल.
पर्यावरणाच्या संवर्धनासाठी विविध ग्रामपंचायती आपल्या क्षेत्रात वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवित आहेत. यात मालेगाव तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायतने यंदाच्या वर्षापासून कन्या वनसमृद्धी योजना राबविण्याचे ठरविले आहे. ग्रामसेवक एम. पी. वानखडे यांच्या संकल्पनेतून ही योजना राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत गावात वृक्षांची संख्या वाढवून पर्यावरण संवर्धन करण्यात येणार आहे. यात १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या कालावधित कन्यारत्नाला जन्म दिलेल्या पालकांना १० वृक्ष लावून ते १९ वर्षे जगविण्यासाठी प्रोत्साहीत केले जाणार आहे. यात ५ फळझाडे आणि ५ पर्यावरण संतुलनीय झाडांचा समावेश राहणार आहे. या योजनेसाठी मुलीच्या जन्म प्रमाणपत्रासह, अल्प, अत्यल्प शेतीचा नमुना ८ अ, भुमीहीनांसाठी वृक्ष लागवडीस उपलब्ध जागेचे हमीपत्र आदि कागदपत्रे लाभार्थींकडून घेण्यात येणार आहेत. या योजनेतील लाभार्थींना ठरलेल्या रकमेचा धनादेश देण्यासाठी मालमत्ता उपकरातील ७० हजार रुपये, तसेच सरपंच वसंता लांडकर यांचे १२ हलार रुपये, उपसरपंच सदाशिव कालापाड, सदस्य बाबाराव लांडकर, सुरेंद्र गुडदे, सविता लांडकर, कडू लगड, ज्योती कव्हर, गिता शिंदे, कल्पना गुडदे यांच्याकडून प्रत्येकी २४०० रुपये मिळून एकूण १ लाख १ हजार २०० रुपये १९ वर्षांसाठी मुदतठेव म्हणून बँकेत जमा करण्यात येतील. ही रक्कम १९ वर्षांत चार लाखांच्यावर जाणार असून, याच रकमेतून वृक्ष लागवड करून ते जगविणाºया पालकांच्या कन्येला एक लाखाचा धनादेश देण्यात येईल.
एकाचवेळी दोन समस्यांवर नियंत्रण
बोरगाव ग्रामपंचायतच्यावतीने राबविण्यात येणाºया कन्या वनसमृद्धी योजनेंतर्गत ४ पालकांची वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी निवड करण्यात येणार असून, त्यांच्याकडून ४० झाडे लावून ती १९ वर्षे जगविण्यात येणार आहेत. या योजनेमुळे पर्यावरणाच्या समस्येसह स्त्रीभृण हत्येच्या समस्येवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शासनाच्या वृक्ष लागवड योजनेसह बेटी बचाओ, बेटी पढाओ या अभियानालाही हातभार लागणार आहे. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी बोरगाव ग्रामपंचायत बहुधा राज्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे.