मुलींनो, पालकांचा विश्वास जपा - रुपाली चाकणकर; विद्यार्थिनींशी साधला संवाद
By संतोष वानखडे | Published: October 11, 2023 07:12 PM2023-10-11T19:12:26+5:302023-10-11T19:12:50+5:30
आंतरराष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधुन स्थानिक राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेत ११ ऑक्टोबर रोजी आयोजित संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
वाशिम : कुमारवयात आपल्या हातून चुक होणार नाही याची काळजी मुलींनी घ्यावी. कारण घडलेल्या चुकीने झालेल्या अन्यायाला कायद्याने न्याय मिळतो, पण विस्कटलेले जीवन पुन्हा उभे करणे कठीण असते. मुलींनी आई-वडिलांच्या विश्वासाला कदापिही तडा जाऊ देऊ नये, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी बुधवारी (दि.११) वाशिम येथे विद्यार्थिनींशी संवाद साधताना केले.
आंतरराष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधुन स्थानिक राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेत ११ ऑक्टोबर रोजी आयोजित संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी महिला आयोग सदस्या आभा पांडे, शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे, सोनाली ठाकुर, महिला व बालविकास अधिकारी सुर्यवंशी, मुख्याध्यापिका स्वाती कुळकर्णी, उपमुख्याध्यापिका शिला वजीरे, प्राथमिक मुख्याध्यापिका माधुरी ढोले, पर्यवेक्षक राजेश ढाकरके आदी उपस्थित होते.
चाकणकर म्हणाल्या, रयत शिक्षण संस्थेत शिकत असताना शाळेत झालेले संस्कार व चांगल्या गुणांनी पास झाल्यावर, मुख्याध्यापकांच्या हस्ते आई वडीलांसोबत गुलाब फुलाने होणारा सत्कार उच्च ध्येय गाठण्यासाठी कारणीभूत ठरला. महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून दोन वर्षांपासून महिलांसाठी कार्य करण्याची संधी मिळाली. महाराष्ट्रातील मुली, महिलांवर होणाऱ्या अन्यायाला कायद्याच्या चौकटीत न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यासाठी निर्भया, दामिनी पथकाची मदत घेण्यासाठी मुलींनी संपर्क करावा व त्यांचा संपर्क क्रमांक लक्षात ठेवावा, असा सल्लाही त्यांनी दिली. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी मुलींनी स्वतः सक्षम होणे गरजेचे आहे. शिक्षकांनी पाठ्यपुस्तकासह प्रत्यक्ष जीवन जगण्यासाठी लढायचं कसं व लढताना जिंकायचं कसं या आवश्यक गोष्टींचे ज्ञान मुलींना द्यावे, असेही त्या म्हणाल्या.
‘कॅंडल मार्च’पेक्षा चुकीची घटना घडू नये म्हणून सर्वांगीन प्रयत्न हवे!
बालविवाह रोखण्यासाठी मुलींनी स्वतः पुढे येण्याची गरज आहे असे सांगून, वाईट घटना घडल्यावर कॅंडल मार्च काढण्यापेक्षा, चुकीची घटना घडु नये यासाठी समाजाने प्रयत्न करावा, असेही रुपाली चाकणकर म्हणाल्या. बालविवाह ही मोठी समस्या असल्याचेही त्यांनी सांगितले.