पाण्यासाठी विहिरीवर जीवघेणी गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2018 02:21 PM2018-05-02T14:21:24+5:302018-05-02T14:21:24+5:30
माळशेलूत भीषण पाणीटंचाई
मंगरुळपीर: तालुक्यात पाणीटंचाईची समस्या रौद्र रुप धारण करू लागली आहे. माळशेलू येथे पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीवर अक्षरश: जीवघेणी गर्दी उसळत असून, यामुळे एखादी व्यक्ती विहिरीत पडून अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
मंगरुळपीर तालुक्यातील निम्म्यापेक्षा अधिक गावांत पाणीटंचाईने रौद्र रूप धारण केले आहे. त्या दृष्टीने उपाययोजना तोकड्या असल्यानं पाण्याअभावी ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. पाण्यासाठी ग्रामस्थांना तीन किलोमीटरची पायपीट करावी लागते आहे. तालुक्यातील माळशेलूमध्ये पाणीटंचाईची समस्या खूपच तीव्र झाली आहे. तब्बल १८०९ लोकसंख्या असलेल्या या गावातील जलस्रोत आटल्यानं भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणी टंचाईची समस्या कमी करण्यासाठी ग्रामपंचायतच्यावतीने गावाबाहेर, दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. या विहिरीतील पाणी पाईपलाईनने गावातील विहिरीत चार ते पाच दिवसांनी सोडण्यात येते. या विहिरीत पाणी सोडताच गावकरी पाणी भरण्यासाठी विहिरीवर धाव घेतात. यामध्ये महिला, पुरुष, मुले आणि मुलींचाही समावेश असतो. आधीच आकाराने फारशी लहान असलेल्या या विहिरीच्या काठावर दाटीवाटीने लोक उभे राहून पाणी ओढतात. अशात घाईघाईने पाणी ओढताना स्वत:चा तोल जाऊन किंवा दुसऱ्याचा धक्का लागून एखादी व्यक्ती विहिरीत पडून दुर्घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.