उंद्री प्रकल्पात बुडून शेतक-याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 08:28 PM2019-06-05T20:28:58+5:302019-06-05T20:29:09+5:30
पथकाला १ तासाच्या अथक परिश्रमानंतर शेतक-याचा मृतदेह शोधण्यात यश आले.
कामरगाव (वाशिम) : कारंजा तालुक्यातील बांबर्डा शिवाराला लागून असलेल्या उंद्री प्रकल्पात सिंचनाचे पाईप काढण्यासाठी बांबर्डा कानकिरड गेलेल्या शेतक-याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना ५ जून रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. अनंत रामदास भेंडे असे मृतक शेतक-याचे नाव आहे.
बांबर्डा कानकिरड येथील शेतकरी अनंत भेंडे हे उंद्री प्रकल्पात सिंचनाचे पाईप काढण्याकरीता गेले असता ते पाण्यात बुडाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शनी नागरिकांनी बांबर्डा येथील गावकºयांना दिली. घटनेची माहिती मिळताच कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार धनंजय जगदाडे व धनज पोलिस स्टेशनचे ठाणेदार शिषिर मानकर यांनी तात्काळ आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठले. सर्वधर्मआपतकालीन संस्था कारंजाच्या स्वयंसेवकांनी प्राथमिक शोध मोहीम राबविली. मात्र पाण्याची खोली अधिक असल्याने आपतकालीन पथकाला यश आले नाही. अखेर प्रशासनाने पिंजर येथील संत गाडगेबाबा बचाव पथकास पाचारण केले.
या पथकाला १ तासाच्या अथक परिश्रमानंतर शेतक-याचा मृतदेह शोधण्यात यश आले. बचाव पथकात दिपक सदाफळे, आशिक गुघडे, ऋषिकेश तायडे, मयुर जवके, ओम साबळे, ऋतिक सदाफळे, अंकुश सदाफळे, गोविंदा ढोके,यांचा समावेश होता. तर सर्वधर्मआपतकालीन पथकाचे शाम सवाई, ज्ञानेश्वर निंगोट, सतोंष घुले व भावेश गाडगे यांनी शोधमोहीमेत सहभाग नोंदविला. घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. मंडळ अधिकारी नायब तहसिलदार विनोद हरणे, आशा अदबाने, तलाठी घाटे, ग्रामसेवक दिलीप सकपाळ यांची यावेळी उपस्थिती होती. मृतक अनंत भेंडे हे बांबर्डा येथील सरपंच कांचन भेंडे यांचे पती आहेत. त्यांच्या मनमिळाउु स्वभावामुळे संपूर्ण तालुक्यात त्यांची वेगळी ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन बहिनी असा बराच मोठा आप्त परिवार आहे.