विद्यूत शॉक लागून युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 02:40 PM2020-01-13T14:40:21+5:302020-01-13T14:40:29+5:30
नदीपात्रात हा विद्यूत प्रवाह गेल्याने रात्रीच्या वेळी खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या मंगेश विनायक कानडे नामक युवकास त्याचा जबर शॉक लागला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : विद्यूत शॉक लागून एका २७ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना मानोरा पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या म्हसणी शिवारात ११ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. मंगेश विनायक कानडे असे मृतक युवकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, म्हसणी शिवारात शेतातील पिकांचे वन्यप्राण्यापासून रक्षण करण्याकरिता शेतकऱ्याने कुंपनात विद्यूत प्रवाह सोडला आहे. शेताच्या बांधावर असणाºया अडाण नदीपात्रात हा विद्यूत प्रवाह गेल्याने रात्रीच्या वेळी खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या मंगेश विनायक कानडे नामक युवकास त्याचा जबर शॉक लागला. त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या मेहुण्याने घटनेची माहिती गावात जाऊन देताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली; मात्र तोपर्यंत मंगेशचा मृत्यू झाला होता. कुटुंबियांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
सहा महिन्यांपूर्वीच झाला होता मंगेशचा विवाह
मंगेश कानडे या युवकाच्या आई-वडिलांचे तो लहान असतानाच निधन झाले. सहा महिन्यांपूर्वी त्याचा विवाह झाला. अशातच घडलेल्या घटनेत त्याचाही मृत्यू झाल्याने पत्नीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यामुळे गावातही हळहळ व्यक्त होत आहे.