वाशिम जिल्ह्यातील ३५ हजार शेतकऱ्यांच्या सातबारावर कर्ज कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 02:40 PM2019-08-17T14:40:48+5:302019-08-17T14:40:55+5:30
दोन वर्षानंतरही उर्वरीत ३५ हजार शेतकºयांच्या सातबारावर पीककर्ज कायम आहे.
- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत १.३२ लाखांपैकी आतापर्यंत जिल्ह्यातील ९६ हजार ९५५ शेतकऱ्यांचे ४१३.७१ कोटी रुपयांचे कर्ज माफ झाले आहे तर दुसरीकडे दोन वर्षानंतरही उर्वरीत ३५ हजार शेतकºयांच्या सातबारावर पीककर्ज कायम आहे. कर्जाचा नियमित भरणा केल्यानंतरही प्रोत्साहनपर २५ हजारांचे अनुदान मिळाले नसल्याने वंचित शेतकºयांमधून रोष व्यक्त होत आहे.
जून २०१७ मध्ये कर्जमाफीच्या मुद्यावरून विविध संघटना तसेच शेतकºयांनी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दीड लाख रुपयांची मर्यादा घालून कर्जमाफी योजनेची आॅनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली. सुरूवातीला ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागविले होते. या मुदतीत एक लाख २८ हजार शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज सादर केले. त्यानंतर अर्ज सादर करण्याला एका महिन्याची मुदतवाढ मिळाल्याने जवळपास १.६४ लाख अर्ज प्राप्त झाले. पात्र शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी तसेच यादी अचूक करण्याच्या दृष्टिकोनातून गावस्तरावर चावडी वाचन, अर्जांची पडताळणी व किरकोळ दुरूस्त्या केल्यानंतर १.३२ लाख शेतकºयांची यादी शासनाकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आली. त्यानंतर या योजनेच्या निकषात वारंवार बदल होत गेल्याने, ही यादीही बदलत गेली. १४ आॅगस्ट २०१९ पर्यंत या यादीतील ९६ हजार ९५५ शेतकºयांचे ४१३.७१ कोटी रुपयांचे कर्ज माफ झाले असून, अजून जवळपास ४ हजार शेतकºयांचे पीककर्ज माफ होऊ शकते, असा अंदाज जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने व्यक्त केला. ्त्यामुळे उर्वरीत ३१ हजार शेतकºयांच्या पीककर्जाचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कर्जमाफीसाठी पात्र की अपात्र, यासंदर्भात संबंधित शेतकºयांना कोणताही संदेश मिळाला नसल्याने शेतकºयांमध्ये संभ्रम कायम आहे. कर्जमाफीचा लाभ मिळत नसल्याने शेतकºयांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
दरम्यान, कर्जमाफीचा लाभ मिळावा, याकरीता आॅनलाईन अर्ज सादर करण्याला वारंवार मुदतवाढ देण्यात आली तसेच निकषात बदलही करण्यात आला. परंतू, ही वाढीव यादी शासनाकडून किंवा महा आॅनलाईन यंत्रणेकडून अद्याप जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला प्राप्त झाली नाही.
कर्जाचा नियमित भरणा; प्रोत्साहनपर अनुदान नाही
पीककर्जाचा नियमित भरणा करणाºया शेतकºयांना २५ टक्के प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. यासाठी शेतकºयांची यादीही तयार करण्यात आली. परंतू, वाशिम तालुक्यातील कार्ली परिसरातील जवळपास २०० शेतकºयांना या प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळाला नाही. यासंदर्भात संबंधित यंत्रणेकडे वारंवार विचारणा करण्यात आली. परंतू, टोलवाटोलवीची उत्तरे मिळाल्याने शेतकºयांमधून रोष व्यक्त होत आहे. २८ आॅगस्ट रोजी जनता दरबार असून, यामध्ये प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळाला नसल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे, असे कार्ली येथील महिला शेतकरी द्वारकाबाई देशमुख यांनी सांगितले.
पीककर्जाचा विहित मुदतीत नियमित भरणा करण्यात आला. कार्ली परिसरातील २०० पेक्षा अधिक शेतकºयांना या प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ अद्याप मिळाला नाही. प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळावा यासाठी संबंधित बँक, तालुका सहनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधून विचारणा केली. परंतू, न्याय मिळाला नाही. २८ आॅगस्ट रोजी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाºया जनता दरबारातदेखील तक्रार दाखल केली आहे.
- द्वारकाबाई देशमुख
महिला शेतकरी, कार्ली
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील ९६ हजार ९५५ शेतकºयांचे ४१३.७१ कोटी रुपयांचे कर्ज माफ झाले आहे. ग्रीन लिस्टमधील अजून चार हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो. कार्ली परिसरातील प्रोत्साहनपर अनुदानाच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात संबंधितांकडून माहिती घेतली जाईल. पात्र शेतकरी प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.
- रमेश कटके,
जिल्हा उपनिबंधक, वाशिम.