कर्जमुक्त शेतकर्‍यांना मिळणार रब्बी पीक कर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:53 AM2017-10-23T00:53:36+5:302017-10-23T00:54:16+5:30

वाशिम: राज्य शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफी योजनेतून कर्ज माफ झालेल्या शेतकर्‍यांना चालू रब्बी हंगामात पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. तर दुसरीकडे आचारसंहितेमुळे चावडी वाचन न झालेल्या गावांमध्ये दुसर्‍या टप्प्यात चावडी वाचन केले जात आहे. चावडी वाचनानंतर या गावातील शेतकर्‍यांची यादी अद्ययावत केली जाणार आहे.

Debt-free farmers will get Rabi Crop Loan! | कर्जमुक्त शेतकर्‍यांना मिळणार रब्बी पीक कर्ज!

कर्जमुक्त शेतकर्‍यांना मिळणार रब्बी पीक कर्ज!

Next
ठळक मुद्देपहिल्या टप्प्यात मध्यवर्ती बँकेचा समावेश दुसर्‍या टप्प्यात चावडी वाचन 

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: राज्य शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफी योजनेतून कर्ज माफ झालेल्या शेतकर्‍यांना चालू रब्बी हंगामात पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. तर दुसरीकडे आचारसंहितेमुळे चावडी वाचन न झालेल्या गावांमध्ये दुसर्‍या टप्प्यात चावडी वाचन केले जात आहे. चावडी वाचनानंतर या गावातील शेतकर्‍यांची यादी अद्ययावत केली जाणार आहे.
यावर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कर्जमाफीच्या मुद्यावरून राज्यभरातील विविध संघटना तसेच शेतकर्‍यांनी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने सुकाणू समिती व शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा करीत कर्जमाफी जाहीर  केली. दीड लाख रुपयांची र्मयादा घालून कर्जमाफी योजनेची प्रक्रिया राबविण्यात आली. वाशिम जिल्हय़ात एकूण २ लाख ६0 हजार शेतकर्‍यांनी कर्जमाफीसंदर्भात ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख २७ हजार शेतकर्‍यांनी अंतिम मुदतीपर्यंत ऑनलाइन अर्ज भरले आहेत; पात्र शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी तसेच यादी अचूक करण्याच्या दृष्टिकोनातून पहिल्या टप्प्यात गावस्तरावर चावडी वाचन घेण्यात आले. चावडी वाचनातून अचूक ठरणार्‍या अर्जांची पडताळणी व किरकोळ दुरुस्त्या केल्यानंतर कर्जमाफी योजनेत पात्र शेतकर्‍यांचा समावेश केला जात आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पात्र शेतकरी घेतले असून, अचूक अर्ज असलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ दिला जात आहे. १८ ऑक्टोबर रोजी कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात ३३ शेतकर्‍यांचा पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते कर्जमाफी प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.  ३0 ऑक्टोबरपर्यंत जवळपास ५0 हजार शेतकर्‍यांना कर्जमाफी प्रमाणपत्र देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जवळपास ७९ हजार १३८ लाभार्थी असून, अचूक अर्ज असणार्‍या शेतकर्‍यांच्या बँक खात्यांची पडताळणी सुरू केली आहे. कर्जमाफीचा लाभ मिळल्यानंतर या शेतकर्‍यांना रब्बी हंगामात पीककर्ज उपलब्ध करून दिले जाईल. रब्बी हंगामात पीक कर्जाची उचल करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या खरिपाच्या तुलनेत अत्यल्प असते. तथापि, रब्बी हंगामात पीक कर्जाची मागणी नोंदविल्यानंतर कर्जमुक्त झालेल्या शेतकर्‍यांना विहित अटी व शर्तीच्या अधीन राहून संबंधित बँकेतून पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. 
दुसरीकडे राष्ट्रीयीकृत, खासगी, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या पात्र शेतकर्‍यांच्या बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक व अर्जांची पडताळणी दुसर्‍या टप्प्यात केली जाणार आहे. साधारणत: १५ नोव्हेंबरपर्यंत पात्र ठरलेल्या सर्व शेतकर्‍यांना कर्जमुक्ती प्रमाणपत्र दिले जाईल, अशी शक्यता जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी ‘लोकमत’शी बोलताना वर्तविली. 

चावडी वाचन .
पहिल्या टप्प्यात निवडणूक आचारसंहिता नसलेल्या गावांत चावडी वाचन घेण्यात आले. आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्याने उर्वरित २७३ गावांत चावडी वाचन सुरू करण्यात आले आहे. लवकरच चावडी वाचनातून अद्ययावत यादी तयार केली जाणार आहे. त्यानंतर कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे.

कर्ज माफ झालेल्या शेतकर्‍यांना निश्‍चितच रब्बी हंगामात पीक कर्ज मिळणार आहे. शेतकर्‍यांनी संबंधित बँकेत तशी मागणी नोंदविल्यास कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. मध्यवर्ती बँकेच्या ५0 हजार शेतकर्‍यांना ३0 ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्याचे नियोजन आहे.
- रमेश कटके,
जिल्हा उपनिबंधक, वाशिम 

Web Title: Debt-free farmers will get Rabi Crop Loan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी