मालेगावात कर्ज मेळावा
By admin | Published: March 23, 2017 02:11 AM2017-03-23T02:11:06+5:302017-03-23T02:11:06+5:30
सुशिक्षित बेरोजगार युवकांनी मोठय़ा संख्येने हजेरी लावली.
मालेगाव (वाशिम), दि. २२- प्रधानमंत्री मुद्रा योजनेविषयी जनजागृती म्हणून प्रत्येक तालुक्यात प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळावे घेण्यात येत आहेत. त्यानुसार बुधवारी मालेगाव येथील जुने बसस्थानक परिसरात मेळावा घेण्यात आला असून, सुशिक्षित बेरोजगार युवकांनी मोठय़ा संख्येने हजेरी लावली.
मेळाव्याला नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक विजय खंडारे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे, तहसीलदार रवी राठोड, स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक चंद्रशेखर धारगावे, जिल्हा माहिती कार्यालयाचे तानाजी घोलप आदी उपस्थित होते. यावेळी विजय खंडारे म्हणाले की, प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून बेरोजगार युवकांना सहज व कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही लहान-मोठे उद्योग, व्यवसाय सुरु होऊन बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. मुद्रा योजनेतून कर्ज मिळविण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज बँकेकडे सादर करावा. त्यानंतर सदर बँकेचे शाखा व्यवस्थापक तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करतील व त्यानुसार कर्ज मंजूर करण्यात येईल, असे खंडारे यांनी स्पष्ट केले.
नगराळे यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज प्रकाराबाबत मार्गदर्शन केले. प्रारंभी मालेगावचे तहसीलदार राठोड यांनी प्रास्ताविकामध्ये प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळाव्याच्या आयोजनाचा हेतू विषद केला. मालेगाव तालुक्यातील जास्तीत जास्त बेरोजगार युवकांपयर्ंत प्रधानमंत्री मुद्रा योजनेची माहिती पोहोचावी व त्याद्वारे तालुक्यात नवीन उद्योग, व्यवसाय सुरु होण्यास मदत व्हावी, हा या मेळाव्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी वैद्य, धारगावे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. संचालन मंडळ अधिकारी सुनील लोखंडे यांनी केले.
कारंजा येथे आज मेळावा
२३ मार्च रोजी कारंजा तहसीलदार कार्यालय परिसरात प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळावा आयोजित केला आहे. यामध्ये बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी सुशिक्षित बेरोजगार युवकांना मार्गदर्शन करणार आहेत.