पहिल्या तारखेला वेतन अदा करण्याच्या निर्णयाचे तीन तेरा
By admin | Published: June 14, 2017 08:09 PM2017-06-14T20:09:18+5:302017-06-14T20:09:18+5:30
जिल्ह्यातील वास्तव: शिक्षकांचे वेतन होते उशिरा
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: शिक्षकांना महिन्याच्या पहिल्या तारखेला वेतन अदा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तथापि, वेगवेगळ्या तांत्रिक कारणांमुळे अद्यापही या निर्णयाची अंमलबजावणी शक्य झाली नसल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.
दर महिन्याच्या पहिल्या तारखेलाच शिक्षकांचे वेतन अदा करण्याचा राज्य शासनाचा निर्णय आहे. त्यावर अंमल करण्यासाठी जिल्ह्याचा शिक्षण विभाग कसोशीचे प्रयत्न करीत असला तरी वेतनविलंबाचा अध्याय अजूनही संपलेलाच नाही. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनास प्रचंड विलंब होत असल्याने राज्य शासनाने याबाबत गंभीर दखल घेतली होती. आॅगस्ट २०१५ मध्ये शासन निर्णय निर्गमित करून वेतन एक तारखेलाच करण्याचे निर्देश देण्यात आले होते. शिक्षकांना प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला वेतन मिळणे अपेक्षित असताना वाशिम जिल्ह्यातील शिक्षकांच्या वेतनास विलंब होत असल्याची तक्रार शिक्षकांमधून सतत होत असल्याने मागील वर्षी २५ आॅक्टोबर २०१६ रोजी तत्कालीन पालकमंत्री डॉ, रणजीत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करताना प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे वेतन अदा करावे. वेतनास विलंब झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शिक्षण विभागाला दिले होते; परंतु जून महिन्यापर्यंत त्याची अंमलबजावणी पूर्ण जिल्ह्यात तरी झाली नाही. जून महिन्याचे वेतनही शिक्षकांना आठवडाभर उशिरा मिळाले.
शिक्षकांचे वेतन अदा करण्यासाठी निधी मंजूर झाल्यानंतर बिले सादर करण्यात येतात; परंतु निधी मंजूर होण्यास विलंब लागत असल्याने शासनाच्या निर्देशानुसार शिक्षकांचे वेतन महिन्याच्या पहिल्या तारखेला अदा करण्यात अडचणी येतात.
-अंबादास मानकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. वाशिम