पांगरी गावाला नजीकच्या ग्रामपंचायतशी जोडण्यासंदर्भात पंचायत समितीने घेतला ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 01:46 PM2018-09-28T13:46:34+5:302018-09-28T13:48:39+5:30
पांगरी महादेव या गावाला नजीकच्या ग्रामपंचायतशी जोडण्याचा महत्त्वपूर्ण ठराव मंगरूळपीर पंचायत समितीने २७ सप्टेंबर रोजी घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
शेलूबाजार : अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यातून सन २००३ मध्ये मंगरूळपीर तालुक्यात समाविष्ठ झालेल्या; परंतू कोणत्याही ग्रामपंचायतला जोडण्यात न आलेल्या पांगरी महादेव या गावाला नजीकच्या ग्रामपंचायतशी जोडण्याचा महत्त्वपूर्ण ठराव मंगरूळपीर पंचायत समितीने २७ सप्टेंबर रोजी घेतला. हा ठराव शासनाकडे पाठविण्यात येणार असून, यासंदर्भात पाठपुरावा केला जाणार असल्याची माहिती प्रभारी गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस, उपसभापती सुभाष शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना शुक्रवारी दिली.
पांगरी महादेव ता. मंगरूळपीर या दुर्गम भागात वसलेल्या गावाला कोणत्याही ग्रामपंचायतशी जोडण्यात आले नसल्याने शासनाच्या कोणत्याच वैयक्तिक योजनेचा लाभ ग्रामस्थांना मिळत नाही. सन २००३ पासून अशी परिस्थिती असतानाही अद्याप कुणीच याची दखल घेतली नसल्याने गावकºयांमधून रोष व्यक्त होत आहे. मंगरूळपीर तालुक्यात समाविष्ठ झाल्यानंतर पांगरी महादेव येथील मतदार हे पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत मतदान करतात. परंतू, फक्त ग्रामपंचायत अस्तित्वात नसल्यामुळे किंवा इतर कुठल्याही ग्रामपंचायतला सदर गाव न जोडल्यामुळे शासनाच्या आवास योजनेचा तसेच विविध प्रकारच्या कल्याणकारी योजनेचा लाभ आजपर्यंत ग्रामस्थांना मिळाला नाही. सन २०११ मध्ये गावात सामाजिक, आर्थिक जनगणना झाली असून, प्रधानमंत्री आवास योजनेचा कोणताही लाभ गावाला मिळाला नाही, असे सांगत पांगरी येथील सामाजिक कार्यकर्ते नामदेव राठोड यांनी २७ सप्टेंबरला पंचायत समिती पदाधिकारी तसेच गटविकास अधिकाºयांना निवेदन देत ग्रामस्थांच्या समस्या निकाली काढण्याची मागणी केली. या निवेदनाची दखल घेत २७ सप्टेंबरला पंचायत समितीच्या मासिक सभेत पांगरी महादेव गावासंदर्भात चर्चा झाली. शेवटी सर्वानुमते पांगरी गावाला नजीकच्या ग्रामपंचायतशी जोडण्याचा ठराव मंजूर करीत सदर ठराव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.