वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करा : रिपाइं पदाधिकाऱ्यांची मागणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 01:53 PM2018-02-02T13:53:24+5:302018-02-02T13:54:21+5:30

वाशिम - जिल्हयाची आणेवारी सरासरी ४७ पैसे असल्याने शासनाने वाशिम जिल्हा त्वरीत दुष्काळग्रस्त घोषीत करुन न्याय द्यावा, अशी मागणी रिपाई (आठवले गट) पदाधिकाऱ्यांनी केली.

Declear Washim District drought-like: Demand RPI officials | वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करा : रिपाइं पदाधिकाऱ्यांची मागणी  

वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करा : रिपाइं पदाधिकाऱ्यांची मागणी  

googlenewsNext
ठळक मुद्देप्रमुख पिकांची अंतिम आणेवारी सरासरी ४७ पैसे निघाली.घोषणा होवून एक महिना उलटला. परंतु  आतापावेतो जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित झालेला नाही.


वाशिम - जिल्हयाची आणेवारी सरासरी ४७ पैसे असल्याने शासनाने वाशिम जिल्हा त्वरीत दुष्काळग्रस्त घोषीत करुन न्याय द्यावा, अशी मागणी रिपाई (आठवले गट) पदाधिकाऱ्यांनी केली.या अनुषंगाने जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान तेजराव वानखडे म्हणाले की, सन २०१७-१८ करीता खरीप हंगामातील प्रमुख पिकांची अंतिम आणेवारी सरासरी ४७ पैसे निघाली. याची घोषणा होवून एक महिना उलटला. परंतु  आतापावेतो जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित झालेला नाही. जिल्हयाला कुठल्या सवलती व सुविधा देणार हेही स्पष्ट झाले नाही. त्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा. दुष्काळसदृष्य स्थितीमधील सवलतीच्या निकषामध्ये शासन स्तरावरुन बदल सुरु असल्याची माहिती असून सदर निकष जाहीर करण्यास विलंब लागत असल्याने नागरीक व शेतकर्‍यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आल्याने साहजिकच दृष्काळसदृश्य स्थितीत मिळणार्‍या विविध सवलतींच्या लाभाकरीता जिल्हा पात्र ठरला आहे. यासंदर्भात कुठलेच ठोस धोरण अद्याप जाहीर झाले नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्त वाशिम जिल्हयातील विविध गावात करावयाच्या विविध उपाययोजना तातडीने करणे आवश्यक झाले आहे. जिल्हयातील दृष्काळग्रस्त स्थिती पाहता शासनाने त्वरीत जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करण्याची  मागणी तेजराव वानखडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान केली. टंचाईग्रस्त ७७४ गावामध्ये ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आवश्यकतेप्रमाणे कामे सुरु करावे, पिण्याच्या पाण्यासाठी टँकरव्दारे पाणीपुरवठा, मध्यम व लघु प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी राखून ठेवणे याशिवाय मंडळ स्तरावर चारा छावणी उघडण्यास मंजुरी देणे, जमीन महसुलात सुट, विजबिलामध्ये सुट, परिक्षा शुल्कात विद्यार्थ्यांना माफी आदी सुविधा मिळणे क्रमप्राप्त आहे.
 यावेळी रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष शेषराव मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष मोहनसिंग राठोड, मालेगाव तालुका अध्यक्ष प्रकाश गवई, रिसोड तालुका अध्यक्ष हिरामन साबळे, रामदास भगत, संजय भिसे, किशोर अंभोरे, संदीप डिघोळे, पंढरी कंकाळ, उल्हास इंगोले, गोविंदराव इंगोले यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Declear Washim District drought-like: Demand RPI officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम