कोरोनाच्या काळात खासगीसह सरकारी दवाखान्यांतील बाह्यरुग्ण तपासणीत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 12:33 PM2020-06-07T12:33:25+5:302020-06-07T12:33:44+5:30
कोरोनाची भीती असल्याने याचा थेट परिणाम जिल्हा सामान्य रुग्णालयासह खासगी दवाखान्यांमधील बाह्य रुग्ण विभागावर झाला
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च ते मे या तीन महिन्यात लॉकडाऊन तसेच संचारबंदी असल्याने तसेच कोरोनाची भीती असल्याने याचा थेट परिणाम जिल्हा सामान्य रुग्णालयासह खासगी दवाखान्यांमधील बाह्य रुग्ण विभागावर झाला. या दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच खासगी दवाखान्याची ‘ओपीडी’ ५० टक्क्यांवर आली.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्चपासून लॉकडाऊन व संचारबंदी लागू झाली. त्यानंतर जवळपास आठवडाभर जिल्ह्यातील बहुतांश खासगी दवाखाने बंद ठेवण्यात आले. जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी विविध डॉक्टर संघटनांशी चर्चा केल्यानंतर खासगी दवाखाने सुरू झाले. दुसरीकडे कोरोना विषाणू संसर्गाच्या भितीपोटी रुग्णांनीदेखील अत्यावश्यक असेल तरच दवाखान्यात जाणे पसंत केले. त्यामुळे एप्रिल महिन्यात खासगी दवाखान्यातील ओपीडीमध्ये जवळपास ७० टक्के घट होती. दुसरीकडे जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयातही अत्यावश्यक असेल तरच रुग्ण जात असल्याने या रुग्णालयातील ओपीडी ५० टक्क्यांवर आली होती. मे महिन्यात खासगी दवाखाने पूर्णवेळ उघडल्यानंतर ओपीडीत वाढ झाली. जूनपासून ओपीडी पूर्ववत होत असल्याचे खासगी डॉक्टरांनी सांगितल. दुसरीकडे जून महिन्यात सरकारी रुग्णालयांतील ओपीडीतही वाढ होत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
सकाळच्या वेळी गर्दी
साधारणत: जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात दररोज एक हजाराच्या आसपास रुग्ण तपासणीसाठी यायचे; परंतु मध्यंतरी कोरोनामुळे लोक रुग्णालयामध्ये येण्यास घाबरत होते. लॉकडाऊनच्या कालावधीत ६०० वर ओपीडी आली होती. साधारणत: सकाळी ९ ते दुपारी १२ वाजतापर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी रुग्णांची गर्दी होत असल्याचे दिसून येते.