कोरोना संसर्गात घट, पण खबरदारी घेणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:30 AM2021-06-02T04:30:24+5:302021-06-02T04:30:24+5:30

: जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थितीचा आढावा वाशिम : जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने १ जूनपासून जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात ...

Decreased corona infection, but caution is required | कोरोना संसर्गात घट, पण खबरदारी घेणे आवश्यक

कोरोना संसर्गात घट, पण खबरदारी घेणे आवश्यक

Next

: जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थितीचा आढावा

वाशिम : जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने १ जूनपासून जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. संसर्ग कमी झाला असला तरी गाफील राहून चालणार नाही. कोरोना सुरक्षा नियमांचे पालन करणे, मास्कचा वापर करणे, गर्दी टाळणे यासारख्या उपाययोजनांवर यापुढेही भर देऊन कोरोना चाचण्यांची संख्या कायम ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले. जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थिती व खरीप हंगामाच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी १ जून रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा सभेत ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री देसाई म्हणाले, गेल्या सात दिवसांमध्ये जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले असून जिल्ह्याच्या दृष्टीने ही दिलासादायक बाब आहे. त्यामुळे जिल्ह्यात निर्बंध शिथिल करून सर्व दुकाने सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. तसेच रुग्णसंख्येत घट झाली असली तरी कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

खरीप हंगामाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे, खते यांची टंचाई भासणार नाही, याची दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांना बांधावर खते, बियाणे उपलब्ध करून देण्याची मोहीम अधिक गतिमान करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या मोहिमेतून थेट बांधावर खते, बियाणे देण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिल्या. तसेच जिल्ह्यातील पीक कर्ज वितरणाचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला. पोलीस अधीक्षक परदेशी यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.

००

‘पॉझिटिव्हिटी रेट’ १२ वरून ४ पर्यंत खाली

जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी जिल्ह्यातील कोरोनाविषयक सद्यस्थितीची माहिती दिली. ते म्हणाले, गेल्या सात दिवसांमध्ये जिल्ह्याचा ‘पॉझिटिव्हिटी रेट’ १२ वरून ४ ते ५ पर्यंत खाली आला आहे. तसेच दैनंदिन रुग्णसंख्या १०० ते १५० च्या दरम्यान असून जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २ हजाराच्या आत आली आहे. जिल्ह्यात सध्या बाधितांच्या संस्थात्मक विलगीकरणावर भर दिला जात असून सध्या जवळपास ७८ टक्के रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यात गतवर्षी खरीप हंगामात सुमारे २३ हजार शेतकऱ्यांना २०९ कोटी पीक कर्ज वितरित करण्यात आले होते, यंदा आतापर्यंत ६४ हजार ४९ शेतकऱ्यांना ५१७ कोटी ५१ लक्ष पीक कर्जाचे वितरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

०००००

गट शिक्षणाधिकाऱ्यांवर तक्रारी निवारणाची जबाबदारी

जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी पंत म्हणाल्या, ज्या ठिकाणी मूलभूत सुविधा आहेत, अशा ठिकाणी गावपातळीवर संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. तसेच संबंधित तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी यांना याकरिता नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले असून तक्रारी निवारणाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे.

००००

Web Title: Decreased corona infection, but caution is required

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.