चिचांबापेन येथील भारत माध्यमिक शाळेत दीप महोत्सव उत्साहात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 01:36 PM2017-11-02T13:36:03+5:302017-11-02T13:36:39+5:30
रिसोड - रिसोड तालुक्यातील चिचांबापेन येथील भारत माध्यमिक शाळेत दि आर्य शिक्षण संस्थेचे सचिव अॅड. नकुल देशमुख, स्थानिक शाळा समिती अध्यक्ष जगदीशराव सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली २ नोव्हेंबर रोजी दिप महोत्सव पार पडला.
रिसोड - रिसोड तालुक्यातील चिचांबापेन येथील भारत माध्यमिक शाळेत दि आर्य शिक्षण संस्थेचे सचिव अॅड. नकुल देशमुख, स्थानिक शाळा समिती अध्यक्ष जगदीशराव सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली २ नोव्हेंबर रोजी दिप महोत्सव पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी तयार करून आणलेल्या विविध वस्तू शाळा इमारतीवर लावण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक गजानन बानोरे तर प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ शिक्षक पि.के. साबळे, विनोद देशमुख उपस्थित होते. सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करुन दिप प्रज्वलीत करण्यात आला. यावेळी बानोरे म्हणाले की, चैतन्याचा उत्साह म्हणजेच दिपावली. अश्विन मासातील रमा एकादशीनंतर येणारी वसुबारस म्हणजे प्रकाशोत्सवाची सुरुवात असते. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदेनंतर येणारा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा, भगवान श्रीराम चौदा वर्षाचा वनवास संपवून अयोध्येला परतल्यानंतर नागरिकांनी दिव्यांची आरास मांडून रामाचे स्वागत केले. भारतीय जीवनात दिवाळीला धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्व आहे. आनंद, पावित्र्य, प्रकाश उत्सव म्हणजेच दिपावली असल्याचे ते म्हणाले. शाळेतील विद्यार्थी, विद्याथीर्नींनी तयार करुन आणलेले आकाश कंदील, तोरण शालेय इमारतीवर लावण्यात आले. प्रत्येक वर्गाच्या समोर आकर्षक अशा रांगोळ्या काढून दीप लावण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून दिवाळी सण कसा साजरा केला याची माहिती दिली. शिक्षक सचिन चवरे, कैलास कालापाड यांनी आपल्या प्रास्ताविकातून दिवाळी सणाच्या पाच दिवसाचे महत्व सविस्तर सांगितले. ज्येष्ठ शिक्षक साबळे, देशमुख यांची समयोचित भाषणे झाली. या कार्यक्रमास शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी बहूसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन चवरे यांनी तर आभार न.अ. देशमुख यांनी मानले.