सात आरोग्य केंद्रांची कोरोना लसीकरणात दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:39 AM2021-03-24T04:39:46+5:302021-03-24T04:39:46+5:30

वाशिम : जिल्ह्यातील सात प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ज्येष्ठ नागरिक व ४५ ते ६० वयोगटातील दुर्धर आजारग्रस्तांचे शंभर टक्के लसीकरण ...

Delay in corona vaccination of seven health centers | सात आरोग्य केंद्रांची कोरोना लसीकरणात दिरंगाई

सात आरोग्य केंद्रांची कोरोना लसीकरणात दिरंगाई

Next

वाशिम : जिल्ह्यातील सात प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ज्येष्ठ नागरिक व ४५ ते ६० वयोगटातील दुर्धर आजारग्रस्तांचे शंभर टक्के लसीकरण अद्याप पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे जिल्हाधिकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून, या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी संबंधित तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना २२ मार्च रोजी पत्र देऊन लसीकरणाचे उद्दिष्ट तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील ४० केंद्रांत ज्येष्ठ नागरिक व ४५ ते ६० वर्षे वयोगटातील दुर्धर आजारग्रस्तांना कोरोना प्रतिबंधक लस मोफत लस देण्यास सुरुवात करण्यात आली. यात प्रत्येक तालुक्यात लसीकरण वेगात करून उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी या लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला असता मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा, शेलुबाजार, मानोरा तालुक्यातील कुपटा, शेंदुरजना, पोहरादेवी, मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे, तर कारंजा तालुक्यातील मनभा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत लसीकरणाचे काम अत्यल्प असल्याचे आढळून आले. जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण वाढत असताना आरोग्य केंद्रांकडून लसीकरणात होत असलेल्या दिरंगाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेत मंगरुळपीर, मानोरा, मालेगाव आणि कारंजा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना २२ मार्च रोजी पत्र देऊन लसीकरणास वेग देण्यासह तातडीने उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

--------------

जनजागृतीबाबत उदासीनता

जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ६० वर्षे वयोगटातील दुर्धर आजारग्रस्तांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याबाबत व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तथापि, मंगरुळपीर, मानोरा, कारंजा आणि मालेगाव तालुक्यात अनेक गावांत ही जनजागृती करण्याबाबत उदासीनता दिसून आली. त्यामुळे या मोहिमेची व्यापक जनजागृती करून लसीकरणाला प्रतिसाद वाढविण्याच्या सूचनाही जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

Web Title: Delay in corona vaccination of seven health centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.